मुंबई : विराट कोहलीने घोषणा केली आहे की, तो टी 20 वल्ड कप 2021 नंतर क्रिकेटच्या टी 20 वल्डकपसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारणार नाही. परंतु तो वनडे आणि कसोटी मॅचेसमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळेल. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाणारा हा वल्डकप टी -20 मध्ये कर्णधार म्हणून कोहलीची शेवटची टूर्नामेंट असेल.
आता कोहलीनंतर संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार याबाबत चर्चा तीव्र झाली आहे. यात रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. रोहित आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील आहे. त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे.
कोहलीने टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की, कोहली आता एमएस धोनी सारखी भूमिका स्वीकारेल, धोनी ज्याप्रकारे संघात खेळत होता आणि टीमला गाईड करत होता. त्याप्रमाणे विराट देखील काम करेल
राजकुमार म्हणाले की, जेव्हा धोनीनंतर कोहली टीम इंडियाचा कर्णधार बनला, तेव्हा ज्याप्रकारे धोनीने त्याला मदत केली होती, त्याच प्रकारे कोहली भारताच्या टी 20 संघाच्या पुढील कर्णधारालाही मदत करेल. राजकुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 32 वर्षीय कोहलीचे लक्ष आता कर्णधारपद सोडून संघाला टी -20 वल्डकप मिळवून देण्यावर असेल.
राजकुमार यांनी म्हटले आहे की, नवीन कर्णधार संघासाठी नवीन कल्पना आणि रणनीती घेऊन येईल. ते म्हणाले, "नवीन कर्णधार नवीन कल्पना आणि नवीन रणनीती आणेल. त्यामुळे पुढील कर्णधार कोण बनणार आहे, हे पाहणे मनोरंजक असेल. आता कोहली संघात तीच भूमिका बजावेल आणि नव्या कर्णधाराला धोनीसारखीच मदत करेल. तो आता टी 20 वल्डकप जिंकल्यानंतर कर्णधारपद सोडेल याच्यासाठी तो कटिबद्ध असेल."
राजकुमार म्हणाले की, निर्णय घेण्यापूर्वी कोहली त्यांच्याशी बोलला होता. ते म्हणाले की, भारतासारख्या क्रिकेट-वेड्या देशात तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार होणे कोणासाठीही तणावपूर्ण असू शकते. ते म्हणाले, "कोहलीचा हा खूप विचारपूर्वक निर्णय आहे. तो माझ्याशी याविषयी बोलला. तीनही फॉरमॅटमध्ये कॅप्टनिंग केल्यास कोणावरही दबाव येऊ शकतो. म्हणूनच त्याने टी -20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यावर चर्चा करत होतो, कारण तो एक मोठा मुद्दा होता."
पुढे राजकुमार म्हणाले, "विराटला टेस्ट क्रिकेट आवडते. त्याला टीम इंडियाला दीर्घकाळ कसोटीत आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार करायचे आहे. म्हणूनच त्याने टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला जेणेकरून दबाव कमी होईल."