मुंबई : महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. याचसोबत पुन्हा एकदा भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळे नॉक आऊट मॅचमध्ये भारतीय टीमचं नेमकं काय चुकतं? हा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय पुरुष आणि महिला टीमची गेल्या काही वर्षातली वर्ल्ड कपमधली कामगिरी उत्कृष्ट झाली आहे, पण सेमी फायनल किंवा फायनलमध्ये भारतीय टीमला पराभवाला सामोरं जावं लागत आहे
महिला टीम २०२०च्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली, पण त्यांना फायनल जिंकता आली नाही. २०१८ सालीदेखील भारतीय महिला टीम टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झाली होती. २०१७ सालच्या महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.
दुसरीकडे पुरुषांच्या टीमने २०१९ आणि २०१५ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव पत्करला. २०१९ साली न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये आणि २०१५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनलमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं.
भारतीय टीमने २००७ साली झालेला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. पण यानंतर झालेल्या ५ टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताला याच कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. २०१४ साली फायनलमध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला, तर २०१६ साली सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजने भारताला नमवलं.
२०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तर २००२ साली भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता होता.
२००३ वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही ऑस्ट्रेलियानेच भारताचा पराभव केला होता, तर १९९६ च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये श्रीलंकेने भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न मोडलं होतं.
आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. वारंवार स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न बघणाऱ्या भारताला या वर्ल्ड कपमध्ये इतिहास बदलण्याची संधी चालून आली आहे.