टी-20 वर्ल्डकपच्या भारत-पाकिस्तानच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत काय काय घडलं, जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमी लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. जेव्हा जेव्हा हे दोन देश क्रिकेटच्या मैदानावर उतरतात, तेव्हा प्रत्येकजण या सामन्याची वाट पाहत असतो. 24 तारखेला पुन्हा साऱ्या जगाच्या नजरा क्रिकेटच्या मैदानावर असतील, कारण या दिवशी आयसीसी टी -20 वर्ल्डकप 2021 च्या सामन्यात या दोन्ही पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

Updated: Oct 24, 2021, 11:17 AM IST
टी-20 वर्ल्डकपच्या भारत-पाकिस्तानच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत काय काय घडलं, जाणून घ्या title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमी लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. जेव्हा जेव्हा हे दोन देश क्रिकेटच्या मैदानावर उतरतात, तेव्हा प्रत्येकजण या सामन्याची वाट पाहत असतो. 24 तारखेला पुन्हा साऱ्या जगाच्या नजरा क्रिकेटच्या मैदानावर असतील, कारण या दिवशी आयसीसी टी -20 वर्ल्डकप 2021 च्या सामन्यात या दोन्ही पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

टी -20 विश्वचषकातील या दोन संघांची ही सहावी लढत असेल. या दोन्ही संघांमध्ये 20 वर्ल्डकपचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया.

2007मध्ये या फॉरमॅटच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने आले होते. 14 सप्टेंबर रोजी डर्बनमध्ये झालेल्या सामन्यात या सामन्यात 20-20 ओव्हर्स खेळल्यानंतर दोन्ही संघांची धावसंख्या समान होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ विकेट्सच्या मोबदल्यात 141 धावा केल्या होत्या. पाकिस्ताननेही हीच धावसंख्या सात विकेट्स गमावून केली होती. यानंतर बॉल आऊटमध्ये सामन्याचा निकाल ठरवण्यात ठरवण्यात आला. अखेर यामध्ये भारताने बाजी मारली.

2007 मध्ये वर्ल्डकप हे दोन संघ पुन्हा अंतिम फेरीत आमनेसामने आले. 24 सप्टेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांना पहिलं विजेतेपद पटकावण्याची संधी होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा वर्ल्डकप जिंकला होता. या सामन्यातही भारताने प्रथम फलंदाजी करत गौतम गंभीरच्या 75, रोहित शर्माच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर 5 विकेट गमावून 157 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ 19.3 षटकांत 152 धावांवर गारद झाला होता.

यानंतर हे दोन्ही संघ 2012च्या टी -20 विश्वचषकात आमनेसामने होते. 30 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यातंही भारत जिंकला गेला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली होती पण ते 128 रन्सवर बाद झाला. शोएब मलिकने त्यावेळी 28 धावा केल्या. उमर अकमलने 21 धावांचं योगदान दिलेलं. भारताकडून लक्ष्मीपती बालाजीने तीन विकेट्स घेतले होते. रविचंद्रन अश्विन, युवराज सिंग यांच्याकडे प्रत्येकी दोन विकेट्स होत्या. विराट कोहलीच्या नाबाद 78 धावांच्या जोरावर भारताने 17 ओव्हर्समध्ये दोन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलेलं.

दोन वर्षांनंतर, 2014 मध्ये, दोन्ही संघ ढाकाच्या मैदानावर पुन्हा एकमेकांसमोर आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात विकेट्सच्या मोबदल्यात 130 धावा केल्या. त्यांच्याकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नव्हतं. उमर अकमलने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली होती. भारताने हे लक्ष्य 18.3 ओव्हर्समध्ये तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं. पुन्हा एकदा विराट कोहलीची बॅट तळपली होती. त्याने नाबाद 36 धावा केल्या होत्या. सुरेश रैनानेही नाबाद 35 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

2016 मध्ये टी-20 वर्ल्डकप भारतातच आयोजित करण्यात आला होता. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानने पुन्हा प्रथम फलंदाजी करत पाच गडी गमावून 118 रन्स केले होते. प्रथम फलंदाजी करताना अहमद शहजादने 25 रन्सची खेळी खेळली. भारताने हे लक्ष्य 15.5 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. विराट कोहलीने नाबाद 55 धावांची खेळी केली आणि त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.