Perfume Ball म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? भारत-वेस्ट इंडिज सामन्यामुळे का चर्चेत?

What Is Perfume Ball: सध्या भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान सध्या 'परफ्यूम बॉल'ची जोरदार चर्चा सुरु आहे. तुम्ही कधी ऐकलंय का 'परफ्यूम बॉल'बद्दल? 'परफ्यूम बॉल' म्हणजे काय?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 14, 2023, 11:30 AM IST
Perfume Ball म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? भारत-वेस्ट इंडिज सामन्यामुळे का चर्चेत? title=
भारत-वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान परफ्यूम बॉलची चर्चा

What Is Perfume Ball: क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हणून ओळखलं जातं. क्रिकेट हा खेळ जगभरातील अनेक देशांमध्ये खेळला जातो. वेळोवेळी या नियमांमध्ये बदल केला जातो. क्रिकेटच्या नियमांमध्ये वेगवगेळ्या पद्धतीच्या बॉलचा उल्लेख असते. यापैकी वाइड बॉल, नो बॉल, बाऊन्सर, डेड बॉल यासारख्या वेगवेगळ्या टर्म तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. मात्र तुम्ही कधी 'परफ्यूम बॉल'बद्दल (Perfume Ball) ऐकलं आहे का? आम्हाला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकजण काही क्रिकेटमध्ये असतं याबद्दल आज पहिल्यांदाच वाचत असाल. मात्र 'परफ्यूम बॉल'ची चर्चा सध्या भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान सुरु आहे. पण 'परफ्यूम बॉल' म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ काय होतो? भारत आणि वेस्ट इंडिजसामन्यादरम्यान त्याची चर्चा का सुरु आहे? यासारख्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

'परफ्यूम बॉल' म्हणजे काय?

'परफ्यूम बॉल' ही गोलंदाजांकडून जाणूनबूजून वापरली जाणारी अनोखी पद्धत असून अनेकदा नवख्या खेळाडूंविरोधात गोलंदाज याचा वापर करतात. खरं तर हा चेंडू गोलंदाज मुद्दाम टाकतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'परफ्यूम बॉल'चा अगदी सोप्या शब्दात अर्थ सांगायचा झाल्यास असा बॉल जो बाऊन्स होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा चेंडू बाऊन्स होत असेल तर याला बाऊन्सर म्हणायला हवं. मात्र फलंदाजाला टाकण्यात आलेला बाऊन्सर हा त्याच्या शरीराच्या किती जवळून जातो हे सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच 'परफ्यूम बॉल' हा बाऊन्सर चेंडू असला तर प्रत्येक बाऊन्सर हा 'परफ्यूम बॉल' नसतो. 

'परफ्यूम बॉल' नावाचा संदर्भ काय

आता 'परफ्यूम बॉल' कशाला म्हणावं याबद्दल विचारल्यास हा असा चेंडू असतो जो बाऊन्स होऊन फलंदाजाच्या अगदी तोंडाजवळून उसळी घेऊन जातो. म्हणजेच या चेंडूबद्दल सांगताना असं म्हटलं जातं की चेंडू उसळी खाऊन गोलंदाजाच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळून जातो की चेंडूचा सुगंध फलंदाजाला येतो. त्यामुळेच या सुगंधाच्या संदर्भातूनच याला 'परफ्यूम बॉल' असं म्हणतात.

बाऊन्सरचा ट्रेण्ड वाढला

क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलला एक खास प्रकारचा रंग मारला जातो. या रंगाचा सुंगध फलंदाजाला आला पाहिजे एवढ्या जवळून हा बॉल गेला पाहिजे. कोणत्याही फलंदाजाच्या चेहऱ्याजवळून म्हणजेच हेल्मेट जवळून बॉल गेला तर लगेच हेल्मेट तपासलं जातं. मागील काही वर्षांमध्ये बाऊन्सर चेंडू टाकण्याचं प्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाबरोबरच वेस्ट इंडिजच्या अधिक उंचीच्या गोलंदाजांकडून अनेकदा बाऊन्सर वापरले जातात.  

यशस्वीला टाकला 'परफ्यूम बॉल'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला अशाच प्रकारचा म्हणजेच 'परफ्यूम बॉल' टाकण्यात आला होता. जयस्वालचा हा पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना असल्याने त्याच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी मुद्दाम हा असा बॉल टाकण्यात आला. मात्र जयस्वालने दमदार फलंदाजी करत पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं आहे.