मुंबई : दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांशी क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात यावी, असं पत्र बीसीसीआयनं आयसीसीला पाठवलं होतं. पण अशाप्रकारची बंदी घालता येऊ शकत नाही, असं आयसीसीच्या बैठकीत स्पष्ट झालं होतं. यानंतरही पाकिस्तानवर बंदी घालण्यासाठी आमचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत, असं वक्तव्य बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी केलं आहे. वर्ल्ड कपमध्ये मात्र पाकिस्तानविरुद्ध खेळणार का नाही? यावर राय यांनी थेट उत्तर दिलं नाही.
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. १६ जूनला भारत आणि पाकिस्तानमधला सामना नियोजित आहे. पाकिस्तानच्या सामन्यावर बहिष्कार घालायचा असेल तर योग्य प्रक्रिया राबवली जाईल, असं विनोद राय यांनी स्पष्ट केलं. वर्ल्ड कप हा अजूनही ४ महिने लांब आहे. ती वेळ येऊ दे. भारतीय टीम आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेविषयी आम्ही आयसीसीपुढे चिंता व्यक्त केली आहे. आयसीसीनंही चोख सुरक्षा द्यायचं आश्वासन दिलं आहे, असं विनोद राय म्हणाले.
'आयसीसीनं पाकिस्तानवर बंदी घालण्याची आमची मागणी फेटाळली नाही', असा दावा विनोद राय यांनी केला आहे. बीसीसीआयनं आयसीसीला लिहिलेल्या या पत्रामध्ये पाकिस्तानचा थेट उल्लेख नव्हता. पण विनोद राय यांनी मात्र पत्रात पाकिस्तानचा उल्लेख असल्याचं सांगितलं आहे. 'आम्ही आयसीसीला पत्र लिहिलं आहे. ही प्रक्रिया खूप हळू चालते. पण आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे,' असं वक्तव्य विनोद राय यांनी केलं.
भारत आणि पाकिस्तानमधल्या क्रिकेट मॅचच्या मुद्द्याबाबत प्रशासकीय समिती पुढच्या महिन्यात मुंबईत आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी चर्चा करणार आहे.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली. सौरव गांगुली आणि हरभजन यांनीही या मागणीचं समर्थन केलं. तर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी वेगळं मत मांडलं. पाकिस्तानवर बहिष्कार घालून त्यांना फुकटचे पॉइंट का द्यायचे? यापेक्षा पाकिस्तानचा पराभव करून त्यांना वर्ल्ड कपमधूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, असं तेंडुलकर आणि गावसकर म्हणाले होते.