ऑकलंड : भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या २०४ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समननी धडाकेबाज बॅटिंग केली, पण उपकर्णधार रोहित शर्माला मात्र बॅटिंगमध्ये चमक दाखवता आली नाही. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला असला तरी त्याने पहिले फिल्डिंग करत असताना अफलातून कॅच पकडला.
या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर कॉलिन मुन्रो आणि मार्टिन गप्टीलने न्यूझीलंडला ८ ओव्हरमध्ये ८० रनची आक्रमक सुरुवात करुन दिली.
३० रनवर बॅटिंग करत असलेल्या मार्टिन गप्टीलने शिवम दुबेच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. पण स्क्वेअर लेगवर फिल्डिंगला उभ्या असणाऱ्या रोहित शर्माने सीमारेषेवर स्वत:चा तोल सावरुन शानदार कॅच पकडला.
रोहितने कॅच पकडल्यानंतर त्याचा तोल गेल्यामुळे तो सीमारेषेबाहेर जात होता, पण त्याने योग्य क्षणी बॉल हातातून उडवला आणि मग तोल सावरुन त्याने पुन्हा एकदा कॅच पकडला आणि गप्टीलला माघारी धाडलं.
#RohitSharma holds on to a worldly #NZvIND #INDvNZ pic.twitter.com/6liR608UJ3
— Snehadri Sarkar (@amSnehadri) January 24, 2020
पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंनी अर्धशतकं केली. ओपनर कॉलिन मुन्रोने ४२ बॉलमध्ये सर्वाधिक ५९ रन केले. रॉस टेलरने २७ बॉलमध्ये ५४ रन आणि कर्णधार केन विलियमसनने २६ बॉलमध्ये ५१ रन केले. मार्टिन गप्टीलने १९ बॉलमध्ये ३० रनची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि विराट कोहली हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. श्रेयस अय्यरने २९ बॉलमध्ये नाबाद ५८ रन केले. तर केएल राहुलने २७ बॉलमध्ये ५६ रन आणि विराट कोहलीने ३२ बॉलमध्ये ४५ रनची खेळी केली. मनिष पांडे १२ बॉलमध्ये १४ रनवर नाबाद राहिला. शिवम दुबेन ९ बॉलमध्ये १३ रन करुन आऊट झाला. श्रेयस अय्यरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
भारत आणि न्यूझीलंडची दुसरी टी-२० मॅच रविवार २६ जानेवारीला खेळवली जाणार आहे. ही मॅचदेखील ऑकलंडच्या इडन पार्क याच मैदानात होणार आहे.