मुंबई : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पॉर्न व्हिडिओ लाईक झाल्यामुळे खळबळ उडाली. या वादावर आता खुद्द वकार युनूसने स्पष्टीकरण दिलं आहे. माझं अधिकृत ट्विटर हॅण्डल हॅक करण्यात आल्याचं वकार युनूस म्हणाला, तसंच आपण सोशल मीडियाची सगळी अकाऊंट बंद करणार असल्याचंही वकार युनूस म्हणाला.
वकार युनूसने एक व्हिडिओ शेयर करून आपण सोशल मीडीयापासून आता लांब जाणार असल्याचं सांगितलं आहे. माझं सोशल मीडिया अकाऊंट हॅक व्हायची ही पहिलीच वेळ नाही. याआधाही असे प्रकार घडले होते. ट्विटरवर अशा चुकीच्या गोष्टी मी केलेल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया वकारने दिली.
— Waqar Younis (@waqyounis99) May 29, 2020
'आज सकाळी मी उठलो तेव्हा माझ्या अकाऊंटवरून पॉर्न व्हिडिओ लाईक केल्याचं माझ्या लक्षात आलं. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही गोष्ट खेदपूर्ण आणि अडचणीत आणणारी आहे. सोशल मीडिया हे लोकांसोबत संवाद साधण्याचं माध्यम असल्याचं मला वाटतं होतं, पण या व्यक्तीने सगळी वाट लावली. या हॅकरने पहिल्यांदाच माझ्यासोबत हे केलेलं नाही. तीन ते चारवेळा माझं अकाऊंट हॅक करण्यात आलं,' असं वक्तव्य वकारने केलं.
'हा माणूस यावरच थांबेल असं मला वाटत नाही, त्यामुळे मी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझं माझ्या कुटुंबावर जास्त प्रेम आहे. यानंतर आता मी तुम्हाला सोशल मीडियावर दिसणार नाही. याबाबत कोणाला दु:ख झालं असेल तर मी माफी मागतो,' असंही वकार युनूस म्हणाला.