Shubman Gill : ....तर सणसणीत चपराक मिळेल; गुजरातच्या गिलवर संतापला Virender Sehwag!

पंजाब विरूद्ध गुजरात या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) ने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने पंजाविरूद्धचा सामना जिंकला. मात्र गिलने या सामन्यामध्ये फार धिम्या गतीने खेळी केली.

Updated: Apr 14, 2023, 04:31 PM IST
Shubman Gill : ....तर सणसणीत चपराक मिळेल; गुजरातच्या गिलवर संतापला Virender Sehwag! title=

Virender Sehwag Blasts Shubman Gill's Approach : सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्या टीमचा चांगला खेळ होताना दिसतोय. गुरुवारी पंजाब किंग्स (Punjab Kings) विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात गुजरातने अखेरच्या क्षणाला बाजी मारली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो गुजरातचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill). मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) गिलला फटकार लागवलीये. 

पंजाबविरूद्ध गिलची अर्धशतकी खेळी

पंजाब विरूद्ध गुजरात या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) ने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने पंजाविरूद्धचा सामना जिंकला. मात्र गिलने या सामन्यामध्ये फार धिम्या गतीने खेळी केली. यावरून विरेंद्र सेहवागने त्याचे कान टोचले आहेत.

काय म्हणाला सेहवाग?

शुभमन गिलबाबत बोलताना सेहवाग म्हणाला की, सुरुवातीला गिल 9 बॉल्समध्ये 17 रन्सवर खेळत होता. मात्र त्यानंतर त्याचा खेळ फार धिम्या गतीने झाला. मुळात त्याच्या धिम्या खेळीमुळे गुजरात टायटन्स सामना हरू देखील शकत होती. 

सेहवाग पुढे म्हणाला, पंजाबविरूद्धच्या सामन्यात गिलने 49 बॉल्समध्ये 67 रन्सची खेळी केली. तर माझ्यामते 40 किंवा त्याहून अधिक बॉल्समध्ये त्याने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने शेवटच्या 7-8 बॉल्समध्ये 17 रन्स केले. जर गिल त्याच्या अर्धशतकानंतर वेगाने खेळला नसता तर शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरात 17 रन्स करण्याची परिस्थिती उद्भवली असती.

सेहवागची गिलवर तीव्र टीका

सेहवागच्या म्हणण्याप्रमाणे, जर खेळताना तुम्ही स्वत:चाच विचार कराल तर सणसणीत चपराक मिळेल, तुम्ही असं नाहीच खेळू शकत. इतकंच काय तुम्ही रेकॉर्डचा असा विचारही नाही करु शकत. जर शुभमन गिल 200 च्या स्ट्राईक रेटने खेळला असता तर त्याने पंजाबविरूद्धचा सामना फार लवकर संपवला असता. याशिवाय टीमसाठी बरेच बॉल वाचवले असते.