पर्थ : पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक ठोकलं. टेस्ट कारकिर्दीतलं विराटचं हे २५वं शतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अजिंक्य रहाणेला आऊट केलं. त्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ करताना भारताच्या रनचा वेग कायम राखला. त्याने २१४ बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. या शतकासह कोहलीने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलंय.
कोहलीने १२७ इनिंगमध्ये २५वं टेस्ट शतक पूर्ण केले. सर्वात जलद २५ टेस्ट शतक करणारा तो दुसरा बॅट्समन ठरला आहे. ६८ इनिंगमध्ये २५ शतकं झळकावण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. तेंडुलकरला हा पल्ला गाठण्यासाठी १३० इनिंग खेळाव्या लागल्या होत्या. सचिनच्या आणखी एका विक्रमाची कोहलीने बरोबरी साधलीय. कोहलीचे हे ऑस्ट्रेलियातील सहावे कसोटी शतक ठरले आहे. सचिननंही ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा टेस्ट शतकं झळकावली होती.
१४१ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात लागोपाठ २ वर्ष २,६०० पेक्षा जास्त रन करणारा विराट पहिला खेळाडू आहे. २०१८ साली विराटनं आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २,६०० रन केले आहेत. तर २०१७ साली विराटनं २,८१८ रन केले होते.
विराटनं २०१८ साली १४ वनडेमध्ये १३३.५५ च्या सरासरीनं १२०२ रन केले आहेत, यामध्ये ६ शतकांचा समावेश आहे. विराटनं यावर्षी १० टी-२०मध्ये ३०.१४च्या सरासरीनं २११ रन केले. पर्थमधल्या टेस्टआधी विराटनं ११ मॅचमध्ये १,१०० रन केल्या होत्या. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा विराटनं ८७वी रन केली तेव्हा त्याच्या यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या २,६०० रन पूर्ण झाल्या.
लागोपाठ ३ वर्ष २,५०० पेक्षा जास्त रन करणारा विराट पहिला खेळाडू आहे. २०१६ साली विराटनं ३७ मॅचमध्ये २,५९५ रन केले होते.