विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकून रचला इतिहास

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक नवा रेकॉर्ड

Updated: Dec 6, 2020, 07:05 PM IST
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकून रचला इतिहास title=

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. वनडे सिरीज २-१ ने गमवल्यानंतर भारतीय संघाने टी-२० सिरीज मात्र २-० ने जिंकली आहे. आता तिसरा सामना हा मंगळवारी होणार आहे. पण दुसऱ्या सामन्यात विजयासह विराट कोहलीने नवा विक्रम केला आहे. विराटच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला टी-२० मालिकेत मात दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतला विजय हा विराटसाठी खूप खास होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच देशात टी-२० मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. विराटच्या आधी इतर कोणत्याही भारतीय कर्णधाराने हा पराक्रम केला नव्हता आणि हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

सन २०२० मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा हा सलग ९ वा विजय आहे, तर टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताने दुसरे सर्वाधिक लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्येच भारतापुढे 198 धावांचे आव्हान ठेवले होते. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने गेल्या ७ टी-२० मालिकेत ६ मालिका जिंकल्या आहेत, तर फक्त १ मालिका ड्रॉ ठरली आहे.

मागील ७ टी-२० मालिकेत टीम इंडियाची कामगिरी

वेस्ट इंडीज (3-0)

दक्षिण आफ्रिका - ड्रॉ (1-1)

बांगलादेश (2-1)

वेस्ट इंडीज (2-1)

श्रीलंका (2-0)

न्यूझीलंड (5-0)

ऑस्ट्रेलिया (२-०) * या मालिकेचा एक सामना अद्याप बाकी आहे.

दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये ५ गडी गमावून १९४ धावा केल्या आणि त्यास प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाने १९.४ ओव्हरमध्ये षटकांत ४ विकेट गमवत १९५ धावा करत ६ विकेटने हा सामना जिंकला.