दुबई : T20 वर्ल्डकप 2021च्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात भारताला न्यूझीलंड विरुद्ध आठ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठणं फार कठीण झालं आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या T-20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानने दहा विकेट्सने पराभव केला होता. यानंतर पाकिस्तानी माजी कर्णधाराच्या म्हणण्याप्रमाणे, विराटच्या कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचं समजलंय.
टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने सांगितलं की, भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या कुटुंबाला धमक्या येत असल्याची बातमी मिळाली आहे. इंझमामने त्याच्या 'द मॅच विनर' या यूट्यूब चॅनलवर ही गोष्टी सांगितली आहे.
इंझमाम-उल-हक म्हणाला, "हा एक खेळ आहे आणि यामध्ये हार-जीत सुरु असते. मी टीव्हीवर पाहिलं की विराट कोहलीच्या मुलीला धमक्या येत आहेत. जर तुम्हाला विराट कोहलीचे कर्णधारपद किंवा फलंदाजी आवडली नसेल, तर नक्कीच त्याविषयी बोलू शकता. पण माझ्या मते, कोणाच्याही कुटुंबावर जाऊ नये".
इंझमाम पुढे म्हणाला, "काही दिवसांपूर्वी शमीसोबतही असंच घडलं होतं. हा असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्ही कधी चांगला तर कधी वाईट परफॉर्मन्स देता. मात्र या गोष्टींना तुम्ही खेळापर्यंत ठेवा, पुढे नेऊ नका. मला फार वाईट वाटलं, हे घडायला नको होते. तुम्ही भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि संघ निवडीवर टीका करू शकता. पराभव देखील चांगल्या प्रकारे सहन केला पाहिजे."
टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. टीम इंडिया पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 10 विकेट्स राखून पराभूत झाली. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव आहे. टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही आता कठीण झाल्या आहेत.