दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा आयसीसीकडून गौरव करण्यात आला आहे. २०१९ सालचा 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' पुरस्कार विराट कोहलीला देण्यात आला आहे. २०१९ वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी विराटने प्रेक्षकांना स्मिथला न चिडवण्याचा सल्ला दिला होता. यासाठीच विराटला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षासाठी निलंबन केलं होतं. यानंतर २०१९ वर्ल्ड कपमध्ये दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन केलं. भारताविरुद्धच्या मॅचवेळी यावरुनच सीमारेषेवर उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथला चिडवायला सुरुवात केली.
प्रेक्षक स्टीव्ह स्मिथला चिडवत असल्याचं पाहून विराटने प्रेक्षकांना इशारा केला आणि स्मिथला चिडवू नका, तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, असं विराटने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना सांगितलं. यानंतर स्मिथ विराटजवळ आला आणि त्याला हस्तांदोलन केलं.
Who remembers this gesture from Virat Kohli during #CWC19?
The Indian captain is the winner of the 2019 Spirit of Cricket Award #ICCAwards pic.twitter.com/Z4rVSH8X7x
— ICC (@ICC) January 15, 2020
स्मिथ आणि विराट यांच्यात मैदानात अनेकदा वाद पाहायला मिळाले, पण विराटच्या या वर्तणुकीचं सगळ्यांकडूनच कौतुक झालं.
आयसीसीने रिचर्ड एलिंगवर्थ यांची अंपायर ऑफ द इयर म्हणून घोषणा केली आहे. तर दीपक चहरची बांगलादेशविरुद्धच्या टी-२०मधली बॉलिंग ही २०१९ मधली टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम बॉलिंग असल्याचं आयसीसीने घोषित केलं. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.