'आपल्या आलिशान गाड्या, व्हीआयपी वागणूक विसरा,' विराट कोहली, रोहित शर्माला अखेरचा अल्टिमेटम? 'तुमचा फॉर्म...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनी व्हीयआयपी संस्कृती बाजूला ठेवून स्थानिक क्रिकेट खेळायला हवं असं मत मांडलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 6, 2024, 04:41 PM IST
'आपल्या आलिशान गाड्या, व्हीआयपी वागणूक विसरा,' विराट कोहली, रोहित शर्माला अखेरचा अल्टिमेटम? 'तुमचा फॉर्म...'  title=

न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिका 0-3 ने गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंवर सध्या टीका होत आहे. व्हाईटवॉश मिळाल्याने भारताच्या ज्येष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) दुलीप ट्रॉफीत (Duleep Trophy) खेळले असते तर त्यांना फायदा झाला असता असं मत अनेकांनी मांडलं आहे. अनेकांनी त्यांना रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद कैफने अशीच भूमिका मांडली आहे. संघातील स्टार खेळाडूंनी आलिशान गाड्या, विमानं आणि व्हीआयपी वागणूक हे मागे ठेवत स्थानिक क्रिकेट खेळलं पाहिजे असं मत त्याने मांडलं आहे. 

रणजी ट्रॉफीमध्ये, दिल्लीचा सामना चंदीगडशी होणार आहे तर आगामी सामन्यांमध्ये मुंबई ओडिशाचे यजमानपद भूषवणार आहे. भारतीय खेळाडू अद्याप काही दिवस भारतातच असणार आहेत. ते इतक्या लवकर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार नाहीत. त्यामुळे काही खेळाडूंनी रणजी ट्रॉफीसाठी स्वत:ला उपलब्ध करून द्यावे, असं कैफला वाटतं.

"त्यांना फॉर्मची गरज आहे, तसंच अनेक तास फलंदाजी करण्याची गरज आहे. जर ते शतक ठोकण्यात यशस्वी झाले तर त्यांना खूप फायदा होईल आणि मनोबलही वाढेल," असं मोहम्मद कैफने म्हटलं आहे. कैफने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2020 मालिकेतील ऋषभ पंतची आठवणही शेअर केली जिथे सराव सामन्यात त्याने शतका ठोकलं आणि यानंतर त्याने भारतीय संघात स्थान मिळवत इतिहास रचण्यात मदत केली. 

"मला येथे तुम्हाला ऋषभ पंतची आठवण करुन द्यायची आहे. गाबामध्ये त्याने विजयी खेळी केली होती. त्यावेळी तो एकदिवसीय आणि टी-20 संघाचा भाग नव्हता. तो फक्त कसोटी मालिकेसाठी गेला होता, जिथे त्याच्या आधी वृद्धिमान साहा खेळला होता. आपण 36 धावांवर ऑल आऊट होऊन सामना गमावला होता. पण नंतर पंतला संघात घेण्यात आलं . ऋषभ पंतने सराव सामन्यात शतक ठोकलं होतं. यानंतर त्याला संघात घेतलं आणि त्याने संपूर्ण सामन्याचं चित्रच बदललं," असं मोहम्मद कैफ म्हणाला.

मोहम्मद कैफने विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतरांना व्हीआयपी संस्कृती विसरुन स्थानिक क्रिकेट खेळत पुन्हा आपला फॉर्म मिळवावा असं सुचवलं आहे. "म्हणून ज्यांना वाटतं की आपण धावा काढण्यासाठी धडपडत आहोत आणि त्यांना खेळासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यांनी 100 टक्के देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. हे विसरून जा की तुम्ही मोठ्या गाड्या आणि फ्लाइटमध्ये प्रवास करता आणि तुम्हाला तेथे व्हीआयपी वागणूक मिळणार नाही. जर तुम्ही फॉर्म शोधायचा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील," असं त्याने ठामपणे सांगितलं.