भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 11, 2024, 04:15 PM IST
भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...' title=

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू एकमेकांचे जीवलग मित्र आहेत. क्रिकेटचा काळ बदलत गेला तरी, खेळाडूंमधील मैत्री कायम असते. सध्या भारतीय संघात ईशान किशन आणि शुभमन गिल यांची अशी जोडी आहे. दोघे एकमेकांचे फार चांगले मित्र असून मैदान आणि मैदानाबाहेर त्यांची मैत्री नेहमीच दिसून येत असते. भारतीय संघासह प्रवास करताना दोघांनाही एकमेकाची साथ आवडते. मैदानात दोघे एकमेकांची मस्करी करताना, पाय खेचताना दिसत असतात. शुभमन गिल आणि ईशान किशन मागील अनेक काळापासून भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग आहेत. दरम्यान विराट कोहलीने नुकतंच दोघांच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. दोघे जुळे भाऊ असल्याचं विराट कोहली म्हणाला आहे. 

ईशान किशन आणि शुभमन गिल यांना एकमेकांपासून वेगळं करणं फार कठीण आहे. दोघांना एकमेकांची साथ फार आवडते असं विराट कोहलीने सांगितलं आहे. दोघे भारतीय संघातील सीता-गीता असल्याचं विराट कोहली म्हणाला आहे. 

"हे फार मजेशीर आहे. सीता आणि गीता (ईशान आणि शुभमन). त्यांच्यात काय सुरु आहे याची मलाही कल्पना नाही. जास्त काही बोलू शकत नाही. पण यांना दौऱ्यात एकटं राहायला आवडतं. आम्ही जर जेवणासाठी बाहेर गेलो, तर ते एकत्रच येतात. चर्चांदरम्यानही ते एकत्रच असतात. मी त्यांना एकटं पाहिलेलं नाही. ते फार चांगले मित्र आहेत," अस विराटने सांगितलं आहे.

ईशान किशन आणि शुभमन गिल सध्या आयपीएल खेळत आहेत. हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडल्यानंतर शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करत आहे. तर ईशान किशन मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहे. 

राजस्थान रॉयल्सविरोधातील सामन्यात शुभमन गिलने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 72 धावा ठोकल्या. यासह त्यांनी राजस्थानचा पराभव करत त्यांना या हंगामातील पहिल्या पराभवाची धूळ चारली. शुभमन गिलने पाठोपाठ दोन अर्धशतकं ठोकली आहेत. मागील आठवड्यात पंजाब किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात त्याचं शतक हुकलं होतं. 

पण दुसरीकडे ईशान किशनला मात्र सूर सापडलेला नाही. त्याने चार सामन्यात फक्त 92 धावा केल्या आहेत. दरम्यान ईशान किशनला स्थानिक क्रिकेट खेळत नसल्याने बीसीसीआयचा वार्षिक करार गमावला आहे. जर टी-20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवायचं असेल तर त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 

विराट कोहलीबद्दल बोलायचं गेल्यास त्याने सध्याच्या हंगामात एक शतक ठोकलं आहे. बंगळुरुकडून खेळताना त्याने 5 सामन्यात 316 धावा केल्या आहेत. पण बंगळुरुने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. गुणतालिकेत ते तळाशी आहेत. आता बंगळुरु संघ गुरुवारी मुंबईविरोधात भिडणार आहे.