न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे, टी-२० मालिकेसाठी विराटला विश्रांती

न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

Updated: Jan 23, 2019, 06:26 PM IST
न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे, टी-२० मालिकेसाठी विराटला विश्रांती title=

नेपियर : न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयनं याबाबतची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली लागोपाठ क्रिकेट खेळतोय, त्यामुळे विराटला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी आरामाची गरज आहे, असं संघ प्रशासन आणि निवड समितीला वाटत असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. त्यामुळे विराट तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर खेळणार नाही.

शेवटचे २ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीला बदली खेळाडू अजून देण्यात आलेला नाही. पण हॅमिल्टन आणि वेलिंग्टनच्या एकदिवसीय आणि त्यानंतर ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल. टी-२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे.

विराट लाराच्या पुढे, सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० खेळाडूंमध्ये समावेश

 

शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा

टी-२० मालिकेसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहाल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर.

एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक

दुसरा एकदिवसीय सामना- शनिवार २६ जानेवारी, माऊंट मॉनगनुई

तिसरा एकदिवसीय सामना- सोमवार २८ जानेवारी, माऊंट मॉनगनुई

चौथा एकदिवसीय सामना- गुरुवार ३१ जानेवारी, हॅमिल्टन

पाचवा एकदिवसीय सामना- रविवार ३ फेब्रुवारी, वेलिग्टंन

टी-२० मालिकेचं वेळापत्रक

पहिली टी-२० : बुधवार ६ फेब्रुवारी, वेलिग्टंन, दुपारी १२.३० वाजता

दुसरी टी-२० : शुक्रवार ८ फेब्रुवारी, ऑकलंड, सकाळी ११.३० वाजता           

तिसरी टी-२० : रविवार १० फेब्रुवारी, हॅमिल्टन  दुपारी १२.३० वाजता

पहिल्या सामन्यात भारताचा विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनं विजय झाला. यामुळे ५ मॅचच्या मालिकेत भारत १-०नं आघाडीवर आहे. भारतानं १५६ धावांचं आव्हान ३४.५ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शिखर धवननं नाबाद ७५ धावांची खेळी केली. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं.

खरं तर डकवर्थ-लुईस हा नियम पाऊस आला तर वापरला जायचा, पण यावेळी पहिल्यांदाच जास्त सूर्यप्रकाश असल्यामुळे सामना थांबवण्यात आला. बॅटिंग करत असताना भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात सूर्यप्रकाश जात असल्यामुळे त्यांना बॉल दिसायला अडचण होत होती. त्यामुळे अंपायरनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या तासानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताला ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान मिळालं.

या सामन्यात न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण भारतीय बॉलरनी अचूक मारा करत न्यूझीलंडला सुरुवातीपासून धक्के दिले. त्यामुळे ३८ ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संघ १५७ धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून कुलदीप यादवनं १० ओव्हरमध्ये ३९ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर मोहम्मद शमीला १९ रन देऊन ३ विकेट मिळाल्या. युझवेंद्र चहलला २ आणि केदार जाधवला १ विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं ८४ बॉलमध्ये ६४ धावांची खेळी केली.