२०१८ मध्येही सर्वाधिक रन, लागोपाठ ३ वर्ष विराटचं रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला आहे.

Updated: Dec 30, 2018, 11:03 PM IST
२०१८ मध्येही सर्वाधिक रन, लागोपाठ ३ वर्ष विराटचं रेकॉर्ड title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. ही टेस्ट २०१८ या वर्षातली भारताची शेवटची टेस्ट होती. त्यामुळे मॅच जिंकून भारतानं वर्षाचा शेवट गोड केला आहे. २०१८ हे वर्ष क्रिकेटमध्ये विराट कोहलीचंच म्हणावं लागेल. या वर्षात विराट कोहलीनं तिन्ही फॉरमॅट मिळून सर्वाधिक रन केले आहेत. यावर्षी विराटनं २,६५३ रन केले. एवढच नाही तर २०१८ हे लागोपाठ तिसरं वर्ष आहे, जेव्हा विराट सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. २०१६ साली विराटनं २,५९५ रन आणि २०१७ साली २,८१८ रन केले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटनं २८६ रन केले होते. यानंतर इंग्लंड दौऱ्यातल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटनं विक्रमी ५९३ रन केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये विराटला म्हणावी तशी सुरुवात करता आली नाही. पण पर्थमध्ये त्यानं टेस्ट कारकिर्दीतलं २५वं शतक ठोकलं. विराटनं २५७ बॉलमध्ये १२३ रनची खेळी केली.

विराटनं यावर्षी १३ टेस्टमध्ये ५५.०८ च्या सरासरीनं १,३२२ रन केले. विराटशिवाय फक्त श्रीलंकेच्या कुसल मेंडीसला एक हजार रनचा टप्पा ओलांडता आला. मेंडिसनं यावर्षी १,०२३ रन केल्या. यावर्षी टेस्टमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडूही विराटच आहे. विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये ५ शतकं केली आहे. बांगलादेशचा मोमीनुल हक ४ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

विराटच्या नेतृत्वात २६वा विजय

विराट कोहलीनं ४५ मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं यातल्या २६ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. धोनी हा भारताकडून सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं ६०पैकी २७ मॅचमध्ये विजय मिळवला. हे रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला आता फक्त २ विजयांची आवश्यकता आहे.

कोहलीच्या नेतृत्वात परदेशात भारताचा हा ११वा विजय आहे. याचबरोबर कोहलीनं गांगुलीच्या रेकॉर्डचीही बरोबरी केली. गांगुलीनंही परदेशामध्ये ११ टेस्ट जिंकल्या होत्या. गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं ४९ टेस्ट खेळल्या, यामध्ये भारतानं २१ विजय मिळवले.

भारताचा १५०वा विजय

भारताचा ५३२ टेस्टमधला हा १५०वा विजय आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया (३८४), इंग्लंड(३६४), वेस्ट इंडिज (१७१) आणि दक्षिण आफ्रिकेनं (१६२) यापेक्षा जास्त विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा टेस्ट क्रिकेटमधला हा २२२ वा पराभव होता. सर्वाधिक पराभवाच्या बाबतीत इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. इंग्लंडच्या नावावर २९८ पराभव आहेत.