मेलबर्न : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १३७ रननी पराभव झाला. यामुळे ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं २-१ ची आघाडी घेतली आहे. भारताविरुद्धचा या दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं आता रडीचा डाव सुरु केला आहे. या सीरिजमध्ये वापरण्यात येणाऱ्या खेळपट्ट्यांवरच पेननं आक्षेप घेतले आहेत. एवढच नाही तर भारतीय टीममध्ये विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा नसते तर त्यांची अवस्थाही आमच्यासारखीच झाली असती, असं टीम पेन म्हणाला.
स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यासारखे महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नसल्यामुळे आमच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही. भारताच्या टीममध्ये विराट आणि पुजारा नसते तर त्यांनाही आमच्यासारख्या समस्येचा सामना करावा लागला असता. ऑस्ट्रेलियाच्या टीममधले काही खेळाडू नवीन आहेत. त्यांना टेस्ट क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. अनुभव असलेले आमचे खेळाडू परत आल्यानंतर दोन्ही टीममध्ये खऱ्या अर्थानं लढत होईल, असं वक्तव्य टीम पेननं केलं.
मेलबर्नमधल्या खेळपट्टीवर वेग आणि उसळी नव्हती. या मॅचमध्ये पहिले दोन दिवस भारतानं बॅटिंग करून ४४३/७ वर डाव घोषित केला. तर ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या इनिंगमध्ये १५१ रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये २९२ रनची आघाडी मिळाली.
फास्ट बॉलिंग ही आमची ताकद आहे. पण सीरिजमधल्या काही खेळपट्ट्या आमच्या ताकदीला अनुसरुन बनवण्यात आलेल्या नाहीत. या खेळपट्ट्यांवर वेग आणि उसळी नाही. हे खूप त्रासदायक आहे. तुम्ही भारतामध्ये गेलात तर तुम्हाला हिरवीगार गवत असलेली खेळपट्टी दिली जात नाही. पण भारतीय टीम ऑस्ट्रेलियात आली असताना, त्यांना साजेशी खेळपट्टी देण्यात आली आहे, असं पेन म्हणाला. खेळपट्टी अनुकूल मिळाली नसली तरी भारतानं आमच्यापेक्षा चांगला खेळ केल्याचं टीम पेननं मान्य केलं.
३ जानेवारीपासून सिडनीमध्ये चौथ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. सिडनीची खेळपट्टीही स्पिन बॉलिंगला मदत करेल, असं बोललं जात आहे, अशी प्रतिक्रिया टीम पेननं दिली. सिडनीची खेळपट्टी अशी असेल तर भारत २ स्पिनर घेऊन मैदानात उतरु शकतो.