विराटनं इतिहास घडवला, हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 21, 2017, 08:58 PM IST
विराटनं इतिहास घडवला, हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू  title=

कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं. या शतकाबरोबरच कोहलीनं इतिहास बनवला आहे. हे रेकॉर्ड आत्तापर्यंत कोणत्याच खेळाडूला बनवता आलं नव्हतं. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात खेळवण्यात आलेल्या या मॅचमध्ये विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये १८वं शतक झळकावलं. कॅप्टन म्हणून विराट कोहलीचं हे ११वं शतकं आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं विराटचं हे ५०वं शतक होतं. टेस्टमधल्या १८ शतकांबरोबरच कोहलीची वनडेमध्ये ३८ शतकं आहेत.

विराटनं इतिहास घडवला

या टेस्ट मॅचमध्ये शतक लगावल्यानंतर विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधली सरासरी ५०.१२ एवढी झाली आहे. या टेस्टआधी विराट कोहलीनं ६० मॅचच्या १०१ इनिंगमधून ४,६५८ रन्स केल्या होत्या. यामध्ये त्याची सरासरी जवळपास ४६ होती. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्यवर आऊट झाल्यानंतर विराटनं नाबाद १०४ रन्सची खेळी केली. यामुळे विराटची सरासरी ५० पेक्षा जास्त झाली.

वनडे क्रिकेटमध्ये विराटनं ५५ च्या सरासरीनं २०२ मॅचमध्ये ९०३० रन्स केल्या आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये विराटची सरासरी ५२ आहे. ५५ टी-20 मध्ये विराटनं १९५६ रन्स केल्या आहेत.

अशाप्रकारे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असलेला विराट हा एकमेव खेळाडू बनला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीचं रेकॉर्ड याआधी कोणत्याही खेळाडूला करता आलं नव्हतं. कोलकाता टेस्टमध्ये शतक झळकावल्यानंतर विराट कोहली टेस्ट क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर वनडे आणि टी-20 मध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.