मुंबई : राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुचा हा या पर्वातला सलग चौथा पराभव होता. बंगळुरुचं नेतृत्व करणाऱ्या विराटची ही आयपीएलमधली आत्तापर्यंतची सगळ्यात निराशाजनक कामगिरी आहे. मंगळवारी राजस्थानविरुद्धची मॅच ही कोहलीची कर्णधार म्हणून १००वी मॅच होती. आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त मॅचमध्ये नेतृत्व करणारा विराट हा तिसरा खेळाडू ठरला आहे.
विराटला आयपीएलच्या १२व्या मोसमात बंगळुरुला एकही विजय मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे विराट हा सध्या वाईट काळातून जात आहे.
कोहलीच्या आधी आयपीएलमध्ये १०० पेक्षा अधिक मॅचमध्ये महेंद्र सिंह धोनी आणि गौतम गंभीर या दोघांनी नेतृत्व केले आहे. धोनीची टीम सध्या अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. बंगळुरु टीम अंकतालिकेत अखेरच्या क्रमांकावर आहेत. आयपीएल मध्ये ५ हजार पेक्षा अधिक रनचा टप्पा गाठणारा कोहली हा दुसराच खेळाडू आहे. आपल्या तडाखेदार खेळीसाठी प्रसिद्ध असलेला कोहलीला यंदाच्या आयपीएल मध्ये ४ मॅचमध्ये १०० रन देखील करता आल्या नाहीत.
कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये ४ मॅचमध्ये केवळ ७८ रन केल्या आहेत. चेन्नई विरुद्ध झालेल्या सलामीच्या मॅचमध्ये कोहलीने ६ रन केल्या. तर मुंबई विरुद्ध झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये कोहलीने ४६ रनची दमदार खेळी केली. पण त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. हैदराबादविरुद्ध झालेल्या तिसऱ्या मॅचमध्ये कोहली अवघ्या ३ रन केल्या. तर मंगळवारी राजस्थानविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये २३ रनची खेळी केली. त्यामुळे कोहलीला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सलग ४ मॅचमध्ये झालेला
पराभव आणि बॅटिंगने केलेली निराशाजनक कामगिरी अशा दोन्ही जबाबदारीचे ओझे कोहलीच्या खांद्यावर आहे.
कोहलीने आपल्या नेतृत्वात खेळलेल्या १०० पैकी ४४ मॅचमध्ये टीमला विजय मिळवून दिला आहे. तर ५१ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २ मॅच बरोबरीत राहिल्या तर ३ मॅच ही अनिर्णित राहिली. कोहलीची एक कर्णधार म्हणून कामगिरी पाहिली तर त्याची सरासरी ४६.८७ इतकी आहे.
टीम अडचणीत असताना आपल्या खेळीच्या जीवावर टीमला तारणाऱ्या कोहलीला आतापर्यंत तरी सूर गवसतताना दिसत नाही. बंगळुरुला आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे जर बंगळुरुला प्लेऑफ मध्ये खेळायचे असेल, तर त्यांना या पुढील मॅच जिंकणे गरजेचे ठरणार आहे.