मुंबई : विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात टेस्ट क्रिकेटमध्ये सध्या जबरदस्त स्पर्धा सुरु आहे. या दोघांमध्ये सर्वोत्तम कोण याविषयी प्रत्येक क्रिकेट रसिक आणि खेळाडू त्यांची मतं व्यक्त करत आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही हाच प्रश्न विचारण्यात आला, पण गांगुलीने याचं थेट उत्तर देणं टाळलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस सीरिजमध्ये तब्बल ७७४ रन केले. यामध्ये ३ शतकांचा समावेश आहे. स्मिथने टेस्ट क्रिकेटमध्ये २६ शतकं केली आहेत, तर विराटची टेस्टमध्ये २५ शतकं आहेत. सध्या आयसीसीच्या क्रमवारीत स्मिथ पहिल्या आणि विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
स्मिथ आणि विराट यांच्यात सर्वोत्तम कोण? हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. यामुळे काय फरक पडतो? विराट यावेळी जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे. ही गोष्ट आपल्याला खुश करते, पण स्मिथचं रेकॉर्ड सगळं काही सांगून जातं. स्मिथचंही कौतुक करावं तेवढं थोडच आहे, असं गांगुली म्हणाला. स्मिथने ६८ टेस्ट मॅचमध्ये ६४ पेक्षा जास्तच्या सरासरीने रन केले आहेत.