५,२५३ बॉलनंतर टाकला टेस्ट क्रिकेटमधला पहिला नो बॉल

टेस्ट क्रिकेटमध्ये एकही नो बॉल न टाकणारे फारच कमी बॉलर झाले आहेत.

Updated: Sep 17, 2019, 10:19 AM IST
५,२५३ बॉलनंतर टाकला टेस्ट क्रिकेटमधला पहिला नो बॉल title=

मुंबई : टेस्ट क्रिकेटमध्ये एकही नो बॉल न टाकणारे फारच कमी बॉलर झाले आहेत. इंग्लंडच्या क्रिस वोक्सही ऍशेस सीरिजच्या शेवटच्या टेस्टपर्यंत या यादीत होता. पण पाचव्या टेस्टमध्ये अखेर वोक्सने नो बॉल टाकला. या बॉलवर वोक्सला विकेटही मिळाली होती, पण नो बॉलमुळे बॅट्समन आऊट झाला नाही.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेली ऍशेस सीरिज २-२ने बरोबरीत राहिली, तर सीरिजची एक मॅच ड्रॉ झाली. सीरिजच्या पाचव्या टेस्टच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या क्रिस वोक्सने त्याच्या टेस्ट कारकिर्दीतला पहिला नो बॉल टाकला. हा त्याच्या टेस्ट कारकिर्दीतला ५,२५४वा बॉल होता. आपल्या टेस्ट क्रिकेट कारकिर्दीत वोक्सने सुरुवातीचे ५,२५३ बॉलपैकी एकही नो बॉल टाकला नव्हता.

क्रिस वोक्सने टाकलेला बॉल हा ऑस्ट्रेलियाच्या इनिंगच्या ३१व्या ओव्हरचा दुसरा बॉल होता. वोक्सच्या बॉलिंगवर मिचेल मार्श बॅटिंग करत होता. वोक्सने टाकलेला बॉल मार्शच्या बॅटला लागून तिसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात गेला. विकेट मिळाल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला, तर मार्श पॅव्हेलियनकडे जायला निघाला, तेव्हा अंपायरना हा नो बॉल असल्याचा संशय आला. त्यामुळे अंपायरने थर्ड अंपायरकडे विचारणा केली असता तो नो बॉल असल्याचं स्पष्ट झालं, आणि मार्शला नॉट आऊट देण्यात आलं.

क्रिस वोक्सने ३१ टेस्ट मॅचमध्ये ८८ विकेट घेतल्या आहेत, तर १,१४५ रनही केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. वोक्सने ९९ वनडे आणि ८ टी-२० मॅचही खेळल्या आहेत.

कपिल देव, इम्रान खान, डेनिल लिली, इयन बॉथम आणि लान्स गिब्स यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये एकही नो बॉल टाकलेला नाही.