अर्जुन तेंडुलकरच्या पहिल्या विकेटनंतर विनोद कांबळीच्या डोळ्यात अश्रू

भारताची अंडर-१९ टीम आणि श्रीलंकेची अंडर-१९ टीम यांच्यामध्ये ४ दिवसांच्या मॅचला सुरुवात झाली आहे.

Updated: Jul 17, 2018, 06:36 PM IST
अर्जुन तेंडुलकरच्या पहिल्या विकेटनंतर विनोद कांबळीच्या डोळ्यात अश्रू title=

मुंबई : भारताची अंडर-१९ टीम आणि श्रीलंकेची अंडर-१९ टीम यांच्यामध्ये ४ दिवसांच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमधून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं पदार्पण केलं आहे. आपल्या पहिल्याच मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरनं विकेट घेतली. अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेच्या कमील मिशाराला एलबीडब्ल्यू आऊट केलं. या विकेटनंतर अर्जुन तेंडुलकरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू आणि सचिनचा मित्र विनोद कांबळीनंही अर्जुन तेंडुलकरला शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुनला शुभेच्छा देताना विनोद कांबळीनं भावनिक ट्विट केलं आहे. मी हे बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. मी त्याला मोठा होताना आणि कठोर मेहनत घेताना बघितलं आहे. अर्जुन तेंडुलकर मी यापेक्षा तुझ्यासाठी जास्त खुश होऊ शकत नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुझ्या पहिल्या विकेटचा जल्लोष साजरा कर, असं ट्विट विनोद कांबळीनं केलं.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. पण काही वर्ष आधी या दोघांच्या मैत्रीमध्ये कटुता आली होती. सचिननं मनात आणलं असतं तर माझी कारकिर्द आणखी मोठी झाली असती, असं विनोद कांबळी एका रियलिटी शोमध्ये म्हणाला होता. यामुळे सचिन आणि विनोद कांबळीमधले संबंध ताणले गेले होते. सचिन २०१३ साली क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यावेळी केलेल्या भाषणातही सचिननं विनोदबद्दल अवाक्षरही काढलं नव्हतं.

यानंतर ८ वर्षांनी पुन्हा सचिन आणि विनोद कांबळी एकत्र आले. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान हे दोघं एकाच व्यासपीठावर होते. माझ्या आणि सचिनमधले मतभेद आता संपले आहेत, आणि आता सगळं व्यवस्थित आहे. आम्ही एकमेकांना मिठी मारली. आमची मैत्री आता ट्रॅकवर आली आहे, असं विनोद कांबळी या कार्यक्रमात म्हणाला होता.