IPL 2023: गंभीरसोबत झालेल्या वादानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं? विराटचा VIDEO आला समोर

IPL 2023: मैदानात गौतम गंभीरसोबत (Gautam Gambhir) झालेल्या वादानंतर बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 2, 2023, 04:51 PM IST
IPL 2023: गंभीरसोबत झालेल्या वादानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं? विराटचा VIDEO आला समोर title=

IPL 2023: आयपीएलमध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) यांच्यात पार पडलेल्या सामन्यात तुफान राडा झाला. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाल्या. सामन्यानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) आमने-सामने आले होते. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी इतर खेळाडू दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण दोघेही शांत होण्यास अजिबात तयार नव्हते. दरम्यान, मैदानात गोंधळ घातल्याप्रकरणी बीसीसीआयने (BCCI) दोघांवरही कारवाई केली असून, 100 टक्के मानधन काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

सामना सुरु झाल्यानंतर विराट कोहली लखनऊच्या प्रत्येक विकेटनंतर आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता. यावेळी लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक आणि अमित मिश्रा यांच्यासह त्याचा वादही झाला. सामना संपल्यानंतरही विराट कोहलीने अतिशय आक्रमकपणे विजय साजरा केला. सामना संपल्यानंतरही विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये त्याचप्रकारे सेलिब्रेशन करत होता. बंगळुरुने विजयानंतर खेळाडू आनंद साजरा करत असतानाचा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीला विराट कोहली "हा एक गोड विजय होता" (That's a sweet win boys, sweet win, let's go!)असं बोलताना दिसत आहे. यानंतर तो अशाप्रकारे कामगिरी फत्ते करायची असते असं बोलताना ऐकू येत आहे. तसंच काही सेकंदाने बंगळुरुचा हा स्टार खेळाडू सांगतो की "जर तुमच्याच देण्याची क्षमता असेल, तर मग ते स्वीकारावंही लागतं. अन्यथा, देऊ नका".

या व्हिडीओत सर्व खेळाडूंनी विजयानंतरच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये विराट कोहली सांगतो की "आमच्यासाठी हा फार महत्त्वाचा विजय होता. अनेक कारणांसाठी हा एक गोड विजय आहे. खासकरुन इतकी कमी धावसंख्या असतानाही आम्ही ज्याप्रकारे खेळलो. मला वाटतं प्रत्येकाला आपण हे करु शकतो असा विश्वास होता आणि आम्ही विजयी बाजू राहिले ही चांगली गोष्ट आहे".

सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यावर आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 2 च्या गुन्ह्यासाठी दोषी धरण्यात आलं. त्यांच्या मानधनाच्या 100 दंड आकारण्यात आला. दुसरीकडे नवीन-उल-हकने आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावला आहे. वेगवान गोलंदाजाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली दिली.