मुंबई : भारताने अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, संघ प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
'तरूण आणि तितक्याच जिगरबाज खेळाडूंनी ज्या पद्धतीने हा विजय मिळवला. त्याबद्धल मी त्यांचे अभिनंदन करतो. या विजयावर मला प्रचंड गर्व आहे. आमच्या कष्टाचे चीज झाले. 'मेहनत रंग लाई'', अशा शब्दात राहुल द्रविडने आपली प्रतिक्रीया दिली. हा विजय हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे. मात्र, हा क्षण शेवटचा आहे, असे मला वाटत नाही. यापुढेही आणखी मोठी मजल मारायची आहे. आपली ओळख ही केवळ विशिष्ट एका टूर्नामेंटसाठी राहु नये असे मला वाटते, असेही राहुलने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
दरम्यान, शनिवारी झालेल्या डरबन येथील मैदानावर भारताना शानदार विजय मिळवला. भारताने राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताने यापूर्वीही २०१६मध्ये असेच दैदिप्यमान यश मिळवले होते. याही वेळी भारताने असाच विजय मिळवला आहे. भारताच्या विजयात राहुल द्रविडचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते.
अंतिम सामना सुरू असताना, राहुल द्रविड प्रचंड उत्साहीत दिसत होता. हा विजय खेळाडूंनी मैदानावर मिळवला असला तरी, त्यात राहुलचा किती मोठा वाटा आहे, हे टीम इंडियाला माहिती आहे. त्यामुळेच टीम इंडिया या विजयानंतर प्रचंड खूश होती. इतकी की, विजयानंतर राहुल द्रविड जेव्हा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होता, तेव्हा खेळाडू उत्साहाने कल्ला करत होते. त्यामुळे राहुलच्या प्रतिक्रियेतही अडथळा येत होता.