अंडर-१९ वर्ल्ड कप : भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये भिडणार

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानचा मुकाबला होणार आहे.

Updated: Jan 31, 2020, 09:01 PM IST
अंडर-१९ वर्ल्ड कप : भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये भिडणार title=

मुंबई : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानचा मुकाबला होणार आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाचा ७४ रनने पराभव करुन आधीच अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. आता पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ६ विकेटने पराभव केला, त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातली अंडर-१९ वर्ल्ड कप सेमी फायनल मंगळवार ४ फेब्रुवारीला पोचेफस्ट्रूममध्ये होणार आहे. तर दुसरी सेमी फायनल बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ६ फेब्रुवारीला होईल. 

भारत-पाकिस्तानचं रेकॉर्ड

अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण २३ मॅच झाल्या आहेत, यातल्या १४ मॅचमध्ये भारताचा आणि ८ मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला आहे, तर १ मॅच टाय झाली आहे. तर अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ सामने झाले आहेत, यातल्या ४ मॅचमध्ये भारताचा विजय तर ५ मॅचमध्ये पराभव झाला आहे. पण मागच्या ३ वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची मॅच २३ जानेवारी २०१० साली झाली होती.

यंदाच्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताचा ओपनर यशस्वी जयस्वाल शानदार फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जयस्वाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. यशस्वी जयस्वालने ४ मॅचमध्ये १०३.५ च्या सरासरीने २०७ रन केले आहेत. तर बॉलिंगमध्ये रवी बिश्नोईने चमकदार कामगिरी केली आहे. रवी बिश्नोईने ४ मॅचमध्ये ११ विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बिश्नोई चौथ्या क्रमांकावर आहे.

भारताने अशी गाठली सेमी फायनल

भारतीय टीमने लीग फेजमध्ये श्रीलंकेचा ९० रननी, जपानचा १० विकेटने आणि न्यूझीलंडचा ४४ रननी पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ७४ रनने पराभूत केलं.

दुसरीकडे पाकिस्तानने लीग फेजमध्ये स्कॉटलंडचा ७ विकेटने आणि झिम्बाब्वेचा ३८ रननी पराभव केला, पण बांगलादेशविरुद्धच्या मॅचचा निकाल लागला नाही. क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ६ विकेटने पराभव केला.