मुंबई : बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीची घोषणा केली आहे. माजी क्रिकेटपटू मदन लाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांची या समितीवर नियुक्ती झाली आहे. या समितीचा कार्यकाळ हा एका वर्षाचा असणार आहे. या कार्यकाळात ही समिती महिला आणि पुरुष टीमची निवड समिती, महिला टीमच्या प्रशिक्षकाची निवड करतील. महिला टीमचे सध्याचे प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२० मध्ये संपणार आहे.
क्रिकेट सल्लागार समितीमध्ये आरपी सिंग हा सगळ्यात तरुण सदस्य आहे. आरपी सिंगने भारताकडून १४ टेस्ट, ५८ वनडे आणि १० टी-२० मॅच खेळला. आरपी सिंग २००७ साली टी-२० वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा सदस्यही होता. तर मदन लाल हे या समितीमधले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहेत. मदन लाल यांनी भारतासाठी ३९ टेस्ट आणि ६७ वनडे मॅच खेळल्या. मदन लाल १९८३ साली वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीममध्ये होते.
विकेट कीपर आणि बॅट्समन असलेल्या सुलक्षणा नाईक यांनी ११ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केलं. या काळात सुलक्षणा नाईक यांनी २ टेस्ट, ४६ वनडे आणि ३१ टी-२० मॅच खेळल्या.
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीवर गौतम गंभीर याची निवड होईल, असं बोललं जात होतं, पण अखेरच्या क्षणी गंभीरऐवजी आरपी सिंग याच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मदन लाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांची क्रिकेट सल्लागार समिती नव्या निवड समितीची निवड करणार आहे. सध्याचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (दक्षिण झोन), गगन खोडा (मध्य झोन) यांचा कार्यकाळ संपत आहे. या दोघांच्या बदली सदस्यांची निवड क्रिकेट सल्लागार समिती करेल. सरनदीप सिंग (उत्तर झोन), देवांग गांधी (पूर्व झोन) आणि जतीन परांजपे (पश्चिम झोन) यांचा ४ वर्षांपैकी १ वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे.
निवड समिती सदस्यासाठी अजित आगरकर, व्यंकटेश प्रसाद, चेतन शर्मा, नयन मोंगिया, एल शिवरामाकृष्णन, राजेश चौहान, अमेय खुरासिया यांनी अर्ज केला आहे.
याआधी क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली हे सदस्य होते. या तिघांनी अनिल कुंबळेंची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती. पण २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यावर कुंबळेंनी राजीनामा दिला. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर या तिघांनीच रवी शास्त्रींची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली.
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ २०१९ वर्ल्ड कपपर्यंत होता. यानंतर पुन्हा प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी बीसीसीआयने कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांची क्रिकेट सल्लागार समितीवर नेमणूक केली. या सल्लागार समितीनेही रवी शास्त्रींनाच पुन्हा प्रशिक्षक केलं.