मुंबई : विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळायचे किंवा नाही, हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) परवानगी दिली तर आम्ही खेळू. मात्र, त्यांनी नाही म्हटले तर आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, असे मत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल चहल याने व्यक्त केले. यावेळी त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचाही जोरदार निषेध केला.
त्याने म्हटले की, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. आता हे सर्व मर्यादेपलीकडे गेले आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी ठोस कारवाई केलीच पाहिजे, असे चहलने म्हटले. मात्र, यामध्ये पाकिस्तानातील सर्व लोकांचा दोष नाही. मात्र, दोषींविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे, असेही चहलने सांगितले.
आपण त्यांच्याशी चर्चेने प्रश्न सोडवण्याचा खुपदा प्रयत्न केला. पण ते चर्चा करुन सुधारतील असे तरी वाटत नाही. त्यामुळे पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. आपले जवान शहीद होण्याची वाट पाहू नये. दर तीन महिन्यांनी असे दहशतवादी हल्ले होतात. हे हल्ले आता कायमस्वरुपी थांबावायला हवेत, असेही चहलने म्हटले.