मुंबई : वनडे आणि टी-२० क्रिकेटपुढे टेस्ट क्रिकेटची पसंती कमी झाल्यामुळे आयसीसीने २०१९ साली टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात केली. टेस्ट क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक संख्या वाढावी म्हणून डे-नाईट टेस्ट मॅचलाही आयसीसीने सुरुवात केली. यानंतर आता २०२० मध्ये आयसीसी ५ दिवसांच्या टेस्ट मॅचऐवजी ४ दिवसांची टेस्ट मॅच खेळवण्याच्या विचारात आहे. याबद्दल आयसीसी क्रिकेट बोर्डांशी चर्चा करणार आहे.
४ दिवसांची टेस्ट मॅच खेळवल्यामुळे क्रिकेट वेळापत्रक सुटसुटीत होईल. खेळाडूंवरचा दबाव कमी होईल आणि बोर्ड आणि मॅच प्रसारण करणाऱ्या टीव्ही कंपनीला जास्त महसूल मिळेल, असा विश्वास आयसीसीला आहे.
मागच्या २ वर्षांमध्ये ६० टक्के टेस्ट मॅचचे निकाल हे ४ किंवा त्यापेक्षा कमी दिवसात आले आहेत. यामुळेच आयसीसीला ४ दिवसांच्या टेस्ट मॅचसाठी प्रोत्साहन मिळालं आहे. २०१८ ते २०१९ या कालावधीमध्ये ८७ टेस्ट मॅच झाल्या, यातल्या ५२ मॅच ४ किंवा त्यापेक्षा कमी दिवस चालल्या.
४ दिवसांच्या टेस्ट मॅचला २०२३ सालच्या टेस्ट चॅम्पियनशीपपासून सुरुवात होऊ शकते. ४ दिवसांच्या टेस्ट मॅचचा फायदा टी-२० लीग सारख्या स्पर्धांनाही मिळेल, कारण अनेक वेळा टेस्ट सीरिज लांबल्यामुळे खेळाडूंना जगभरातल्या टी-२० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी उशीर होतो.
२०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये ५ ऐवजी ४ दिवसांच्या टेस्ट मॅच झाल्या असत्या तर एकूण ३३५ दिवस वाचले असते. यामुळे टेस्ट मॅच आणि सीरिजची संख्याही वाढली असती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली ४ मॅचची सीरिज २० दिवसांमध्ये खेळवली गेली. जर या सीरिजच्या टेस्ट मॅच ४ दिवसांच्या असत्या तर ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळवता आली असती.
जर ४ दिवसांची टेस्ट मॅच खेळवण्यात आली तर या मॅचची सुरुवात गोल्फ प्रमाणे गुरुवारी करता येईल. गुरुवार ते रविवार मॅच ठेवल्यामुळे आठवड्याच्या शेवटी जास्त दर्शकही मॅच बघायला येतील. ४ दिवसांची टेस्ट मॅच खेळवण्यात आली तर दिवसाला ९८ ओव्हरचा खेळ व्हावा लागेल. सध्या दिवसाला ९० ओव्हरचा खेळ होतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा अर्ध्या तासाचा खेळ वाढवावा लागेल. मैदानात प्रकाश कमी पडू नये म्हणून प्रत्येक मैदानात दिवे असणं बंधनकारक असेल.
याआधी इंग्लंड-आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे यांच्यात ४ दिवसांची टेस्ट मॅच खेळवली गेली आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात ४ दिवसांची टेस्ट मॅच खेळवण्याचा विचार आहे. यासाठी दोन्ही क्रिकेट बोर्डाची मंजुरी गरजेची आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ म्हणाले, '४ दिवसांच्या टेस्ट मॅचसाठी आपल्याला गांभिर्याने विचार करावा लागेल. आपल्याला मागच्या ५ ते १० वर्षांमधलं टेस्ट मॅचचं रेकॉर्डही बघावं लागेल.'