मुंबई : २०२० सालचं आयपीएल सुरु व्हायला अजून अडीच महिन्यांचा कालावधी बाकी आहे. पण त्याआधीच कोलकात्याच्या टीमला धक्का लागला आहे. प्रविण तांबेवर आयपीएल खेळायला बंदी घालण्यात आली आहे. प्रविण तांबे टी-१० लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याला आयपीएल खेळता येणार नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार भारतीय खेळाडू परदेशातल्या लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. प्रवीण तांबेने या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याला आयपीएल खेळता येणार नाही.
डिसेंबर महिन्यात झालेल्या लिलावात प्रविण तांबेला कोलकात्याच्या टीमने २० लाख रुपयांना विकत घेतलं होतं. ४८व्या वर्षी लिलावात विक्री होणारा प्रविण तांबे हा इतिहासातला सगळ्यात वयस्कर खेळाडू ठरला होता. २०१३ साली ४१व्या वर्षी तांबेने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. प्रविण तांबेने आयपीलच्या ३३ मॅचमध्ये २८ विकेट घेतल्या.
प्रविण तांबेच्या रुपात कोलकात्याला धक्का लागला असला तरी त्यांच्या आणखी दोन खेळाडूंवर निलंबनाची टांगती तलवार आहे. फास्ट बॉलर शिवम मावी आणि मधल्या फळीतला बॅट्समन नितीश राणा यांच्यावर वयाची चोरी केल्याचा आरोप आहे. या दोघांवरचे आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
२९ मार्चपासून २०२० सालच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. २४ मे रोजी आयपीएलची फायनल खेळवली जाईल. ५७ दिवस ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे, त्यामुळे यंदा प्रत्येक दिवशी एकच सामना खेळला जाणार आहे. दरवर्षी ८ वाजता सुरु होणारे आयपीएलचे सामने यंदा ७.३० वाजता सुरु व्हायची शक्यता आहे.