टीम इंडिया 5-0 ने कसोटी मालिका जिंकेल, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series 2021) खेळणार आहे. 

Updated: May 22, 2021, 02:50 PM IST
टीम इंडिया 5-0 ने कसोटी मालिका जिंकेल, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी title=

मुंबई : टीम इंडिया लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी (India Tour England 2021 ) रवाना होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series 2021) खेळणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान दोन्ही संघ अंजिक्यपदासाठी आमनेसामने असणार आहेत. तर यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. विराटसेना ही टेस्ट सीरिज 5-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी चक्क इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने केली आहे. (team india will be win test series by 5-0 against englnad, former cricketer monty panesar prediction)

पानेसर काय म्हणाला? 

"टीम इंडिया योग्य वेळी इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. भारतीय संघ ऑगस्टमध्ये ही कसोटी मालिका खेळणार आहे. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये उष्ण वातावरण असतं. अशा परिस्थितीत भारतीय संघ 2 फिरकी गोलंदाज खेळवू शकते. इंग्लंडला 5-0 ने पराभूत करण्याची क्षमता या भारतीय संघात आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा कारनामा केला, तर भारताचा हा परदेशातील सर्वात मोठा विजय ठरेल", असं पानेसरने स्पष्ट केलं. पानेसरने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या दरम्यान त्याने मालिकेबाबत भविष्यवाणी केली.     

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया 

विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.