मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलंय. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी-20 व्यतिरिक्त तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणारेत.
बीसीसीआयने घोषणा केल्यानुसार, भारत मोहाली (20 सप्टेंबर), नागपूर (23 सप्टेंबर) आणि हैदराबाद (25 सप्टेंबर) याठिकाणी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.
त्यानंतर पहिला T20 सामना तिरुवनंतपुरममध्ये (28 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाईल. त्याच वेळी, गुवाहाटी (2 ऑक्टोबर) आणि इंदूर (4 ऑक्टोबर) याठिकाणी दुसरा आणि शेवटचा टी-20 सामना आयोजित केला जाईल. याशिवाय भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनऊ (6 ऑक्टोबर), रांची (9 ऑक्टोबर) आणि दिल्ली (11 ऑक्टोबर) याठिकाणी 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे.
T20 वर्ल्डकपचा भाग असणारे भारतीय खेळाडू एकदिवसीय मालिकेत सहभागी होण्याची शक्यता नाही कारण ते विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची द्वितीय श्रेणीची टीम मैदानात उतरू शकते.
T20 वर्ल्डकपचा सुपर-12 टप्पा 22 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. यामध्ये भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये मोहीम सुरू करणार आहे.