सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटनं विजय झाला. कृणाल पांड्या आणि विराट कोहली भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कृणाल पांड्यानं ४ ओव्हरमध्ये ३६ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या ४ विकेट घेतल्या. कोणत्याही स्पिनरनं ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये एवढ्या विकेट घेतल्या नव्हत्या. याआधी ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियात एकाच टी-२० मध्ये ३ विकेट घेतल्या होत्या. खरंतर या मॅचमध्ये कृणाल पांड्याला आणखी एक विकेट मिळाली असती. पण रोहित शर्मानं कृणालच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंचचा कॅच सोडला.
आठव्या ओव्हरमध्ये कृणाल पांड्याच्या बॉलिंगवर रोहित शर्मा डीप मीड ऑनवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी फिंचनं १९ बॉलमध्ये २२ रन केले होते आणि ऑस्ट्रेलियाचा स्कोअर एकही विकेट न गमावता ६४ रन एवढा होता. एक जीवनदान मिळाल्यानंतरही फिंचला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ९व्याच ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या बॉलिंगवर फिंचला कृणाल पांड्यानं कॅच आऊट केलं. फिंचनं २३ बॉलमध्ये ४ फोरच्या मदतीनं २८ रन केले.
Will Finch be able to make India pay after this dropped catch? #CloseMatters#AUSvIND @GilletteAU pic.twitter.com/ysgJyFHeQ4
— cricket.com.au (@cricketcomau) November 25, 2018
दुसऱ्यावेळी मात्र रोहित शर्मानं त्याची चूक सुधारली आणि ग्लेन मॅक्सवेलचा कॅच पकडला. इनिंगच्या १४व्या ओव्हरला कृणाल पांड्याच्या बॉलिंगवर ग्लेन मॅक्सवेलचा कॅच रोहित शर्मानं पकडला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ९०/४ एवढा होता.
दुसऱ्या टी-२०मध्येही भारताची फिल्डिंग फारशी चांगली नव्हती. भुवनेश्वर कुमारनं त्याची दुसरी ओव्हर आणि इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरचा बॉल ऑफ स्टम्प बाहेर टाकला. डी आर्सी शॉर्टच्या बॅटला लागून बॉल ऋषभ पंतकडे गेला, पण त्याला कॅच पकडता आला नाही. त्यावेळी शॉर्ट ७ रनवर खेळत होता.
मॅचचा दुसरा कॅच जसप्रीत बुमराहनं सोडला. क्रिस लिननं भुवनेश्वर कुमारनं टाकलेला हा बॉल पूल केला. फाईन लेगवर उभ्या असलेल्या जसप्रीत बुमराहजवळ बॉल गेला पण त्याला कॅच पकडता आला नाही. बाऊंड्री लाईन किती लांब आहे याचा बुमराहला अंदाज न आल्यामुळे त्याला कॅच पकडता आला नाही.
पहिल्या टी-२० मॅचमध्येही कर्णधार विराट कोहली आणि खलील अहमदनं कॅच सोडले होते. त्यामुळे भारताला विजयासाठी १७ ओव्हरमध्ये १७४ रनचं आव्हान मिळालं. पाऊस पडल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला हे आव्हान मिळालं. या मॅचमध्ये भारताचा ४ रननी पराभव झाला. दुसऱ्या मॅचमध्ये पाऊस पडल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता.