मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या हंगामाची शुक्रवारी, 15 ऑक्टोबर रोजी एका रोमांचकारी सामन्याने सांगता झाली. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. टी-20 (T20) च्या या रोमांचक स्पर्धेच्या समाप्तीनंतर लवकरच आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 world cup) सुरू होणार आहे. ही स्पर्धा बीसीसीआय (BCCI) युके (UK) आणि ओमान (OMAN) या ठिराणी 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करणार आहे. भारत 24 ऑक्टोबरपासून पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) मोहिमेला सुरुवात करणार आहे.
भारताच्या IPL टी-20 लीगनंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. वर्ष 2016 नंतर पुन्हा एकदा आयसीसी टी-20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. बऱ्याच काळानंतर बीसीसीआय त्याचे आयोजन करण्यास तयार आहे. कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता, सुरक्षा लक्षात घेऊन, भारताऐवजी यूएई आणि ओमानमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या स्पर्धेत मुख्य 12 संघांमध्ये स्पर्धा होणार आहे. या अगोदर, पात्रता सामने खेळले जातील ज्यात चार संघांचा स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला जाईल. क्वालिफायरसाठी गट अ आणि ग्रब ब बनवण्यात आले आहेत. आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड आणि श्रीलंका यांना पहिल्या गटात स्थान देण्यात आले आहे. तर बांगलादेश, ओमान, न्यू पापुआ गिनी आणि स्कॉटलंड दुसऱ्या गटात आहेत.
स्पर्धेचे प्रमुख 12 संघ गट 1 आणि गट 2 मध्ये विभागले गेले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि दोन क्वालिफायर संघ पहिल्या गटात असतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंडसह दोन क्वालिफायर संघ असतील.
भारतीय संघाचे वेळापत्रक (Team india Timetable)
भारतीय संघ स्पर्धेत उतरण्यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळेल. भारताला 24 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. टीम इंडिया 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. यानंतर 3 नोव्हेंबरला भारताचा अफगाणिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. 5 आणि 8 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ स्पर्धेत पात्रता सामना जिंकणाऱ्या संघाशी खेळेल.