क्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय टीम दुसऱ्या टेस्टमध्येही संकटात सापडली आहे. पहिल्या दिवशी भारताची इनिंग २४२ रनवर संपुष्टात आली. यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी न्यूझीलंडला २३५ रनवर ऑलआऊट केलं. पण दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय बॅटिंग पुन्हा गडगडली. दुसऱ्या दिवशी एकूण १६ विकेट गेल्या.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ८९/६ एवढा झाला आहे. हनुमा विहारी ५ रनवर आणि ऋषभ पंत १ रनवर नाबाद खेळत आहेत. ७ रनची आघाडी मिळाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताची सुरुवात पुन्हा खराब झाली. मयंक अग्रवाल ३ रन करुन आऊट झाला. मयंकबरोबर ओपनिंगला आलेल्या पृथ्वी शॉला १४ रन करता आले. चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक २४ रन केले.
न्यूझीलंड दौऱ्यावर संघर्ष करणाऱ्या विराट कोहलीला शेवटच्या इनिंगमध्येही सूर गवसला नाही. विराट कोहली १४ रन करुन माघारी परतला. अजिंक्य रहाणेला नील वॅगनरने ९ रनवर बोल्ड केलं. नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेल्या उमेश यादवलाही एकच रन करता आली. न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने ३ तर टीम साऊदी, नील वॅगनर आणि कॉलिन डिग्रॅण्डहोमला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात न्यूझीलंडने ६३/० अशी केली होती. पण भारतीय बॉलरनी जोरदार पुनरागमन केलं. भारतीय बॉलरनी न्यूझीलंडचा डाव २३५ रनवर संपवून ७ रनची आघाडी घेतली. मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर बुमराहला ३ विकेट, जडेजाला २ आणि उमेश यादवला १ विकेट मिळाली.