दुबई: टीम 20 वर्ल्ड कप नंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं विराट कोहलीनं सांगितलं आहे. त्यानंतर टीम इंडियाच्या टी 20 फॉरमॅटची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर येणार अशी चर्चा आहे. टीम इंडियाचा पुढचा कर्णधार रोहित शर्मा टी 20 फॉरमॅटसाठी असू शकतो. टी 20 शिवाय रोहित शर्माच्या खांद्यावर आणखी एक मोठी जबाबदारी पडणार आहे. यासाठी क्रिकेटप्रेमी आणि चाहते खूप उत्सुक आहेत.
टी 20 वर्ल्ड कपमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय कोहलीनं घेतला. हे त्याने ट्वीट करून सांगितलं होतं. आता कोहलीच्या हातून वन डे फॉरमॅटमधील कर्णधारपद देखील काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचे नेतृत्व करणार असल्याचे कोहलीनं सांगितलं होतं.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्गही जवळपास बंद झाला. विराटच्या नेतृत्वावर सोशल मीडियावरच नव्हे तर क्रिकेट विश्वातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे विराटच्या हातून वनडेचे कर्णधारपदही काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा हा वन डेच्या कर्णधारपदासाठी दावेदार असू शकतो असं BCCI च्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे त्याच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते अशीही एक चर्चा आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दुसरीकडे BCCI ने न्यूझीलंड विरुद्ध सीरिजसाठी के एल राहुल तात्पुरता कर्णधार असावा यावर चर्चा केली. के एल राहुल IPL मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. BCCI ने टीम इंडियाच्या काही दिग्गज क्रिकेटपटूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
असं करण्यामागे कारण टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सीरिजपासून टी-20 वर्ल्ड कपपर्यंत आरामच मिळालेला नाही. त्यामुळे या सीरिजसाठी देखील बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.