विराटला डच्चू? T20 World Cup फायनलसाठी संघात स्थान नाही? रोहित स्पष्टच म्हणाला, 'त्याचा फॉर्म आमच्यासाठी..'

T20 World Cup Rohit Sharma On Virat Kohli: विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या सातही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं असून भारतीय संघ फायनलला पोहचल्यानंतर रोहित शर्माने सूचक विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2024, 08:36 AM IST
विराटला डच्चू? T20 World Cup फायनलसाठी संघात स्थान नाही? रोहित स्पष्टच म्हणाला, 'त्याचा फॉर्म आमच्यासाठी..' title=
सामन्यानंतर बोलताना रोहितचं विधान

T20 World Cup Rohit Sharma On Virat Kohli: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला यंदाचा टी-20 वर्ल्ड कप फारसा चांगला गेलेला नाही. विराटला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराटने 7 सामन्यांमध्ये केवळ 75 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या या बॅड पॅचमध्ये त्याच्या नावावर दोन गोल्डन डक म्हणजेच भोपळाही न फोडता बाद झालेल्या इनिग्सची नोंद झाली आहे. गुरुवारी वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमध्येही विराट इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्वस्तात तंबूत परतला.

विराटवर टीकेचा भडीमार

सेमी-फायनलमध्ये विराट 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतला. सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये तो बाद झाला. विराटने वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या या सुमार कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता अगदी त्याला फायनलमध्ये संघातच स्थान न देण्यासंदर्भातही सोशल मीडियावरुन मागणी केली जात आहे. विराटऐवजी एखाद्या इन फॉर्म खेळाडूला सलामीला आणा अशी मागणी चाहते करत आहेत. विराटवर होत असलेल्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेतील त्याचा ओपनिंग पार्टनर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माने अगदी स्पष्टपपणे आपलं मत नोंदवलं आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर रोहितने विराटच्या कामगिरीबद्दल भाष्य केलं आहे. 

विराटबद्दल रोहित काय म्हणाला?

रोहित शर्माने विराट कोहलीची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं आहे. विराटचा सध्याचा फॉर्म हा माझ्यासाठी चिंतेचा विषय नसल्याचं रोहितने स्पष्टपणे सांगितलं आहे. "तो (विराट) एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडू या असल्या फेजमधून जातो. आम्हाला त्याचा दर्जा काय आहे आणि तो किती महत्त्वाचा आहे याची कल्पना आहे. त्याचा फॉर्म हा आमच्यासाठी कधीच चिंतेचा विषय नसतो. त्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. तो नक्कीच (फायनलमध्ये) खेळेल याच शंका नाही," असं रोहितने भारतीय संघ फायनलला पोहचल्यानंतर म्हटलं आहे.तसेच विराट कोहली हा मोठ्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करतो असं म्हणताना तो फायनलमध्ये नक्कीच चांगला खेळेल, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.

आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी गाठ

भारतीय संघ 10 वर्षानंतर पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने गुरुवारी इंग्लंडवर 68 धावांनी विजय मिळवला. गुआनामधील प्रोव्हिडन्सच्या मैदानावर भारताने मिळवलेल्या या विजयासहीत त्यांनी फायनलमध्ये मजल मारली असून फायनलचा सामना 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. पहिल्या सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 9 विकेट्सने पराभूत करत दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

रोहित आणि सूर्यकुमारने वाचवलं

सेमी-फायनलच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला 20 ओव्हरमध्ये 7 बाद 171 धावा करता आल्या. टॉस जिंकून इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. एका क्षणी भारतीय संघ 5.2 ओव्हरमध्ये 40 वर 2 बाद अशा स्थितीत होता. मात्र सूर्यकुमार आणि रोहित शर्माने 73 धावांची पार्टनरशीप करत डावाला आकार दिला. रोहितने 39 बॉलमध्ये 57 तर सूर्यकुमारने 36 बॉलमध्ये 47 धावा केल्या.

भारतीय गोलंदाजांची कमाल

सामन्याच्या दुसऱ्या इनिंग्समध्ये अक्षर पटेलने इंग्लंडच्या 3 महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याला कुलदीप यादवने उत्तम साथ दिली. अक्षरने 23 धावा देत 3 बळी घेतले तर कुलदीपने इतकेच बळी घेण्यासाठी अवघ्या 19 धावा दिल्या.

या गोष्टीचा भारताला झाला फायदा

"आम्ही संघ म्हणून फार संयमाने परिस्थितीला सामोरं गेलो. आम्हाला या संधीचा अर्थ ठाऊक आहे. आम्ही शांत राहिल्याने आम्हाला योग्य निर्णय घेता आले. हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला याच गोष्टीचा फायदा झाला. तुम्ही उत्तम क्रिकेट खेळलं पाहिजे. आम्हाला फायनलमध्येही हेच करायचं आहे," असं रोहित म्हणाला.