T20 World Cup: मला स्पष्ट काय ते सांगा, विराटने BCCI ला सांगितलं; निवड समिती म्हणाली 'तू रोहितला...'

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये नेमकं आपलं काय स्थान आहे याबाबत विराट कोहलीला (Virat Kohli) स्पष्टता हवी आहे. त्याने निवड समितीकडे याबाबत उत्तर मागितलं आहे. यावर निवड समितीने त्याला एक पर्याय दिला आहे.    

शिवराज यादव | Updated: Apr 17, 2024, 01:55 PM IST
T20 World Cup: मला स्पष्ट काय ते सांगा, विराटने BCCI ला सांगितलं; निवड समिती म्हणाली 'तू रोहितला...' title=

T20 World Cup: एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे बीसीसीआय निवड समिती जून महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीला लागली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा वर्ल्डकप खेळला जाणार आहे. निवड समिती सध्या संघबांधणी करत असून, यासाठी वेगवेगळे पर्याय चाचपले जात आहेत. त्यामुळे जर टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली रोहित शर्मासह ओपनिंगला खेळताना दिसला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने तशी इच्छा व्यक्त केली आहे. मुंबईत नुकतीच अजित आगरकर, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात बैठक झाली. यादरम्यान विराट कोहलीला फलंदाजीला ओपनिंगला पाठवण्यासंदर्भात फार गांभीर्याने चर्चा करण्यात आली. 

टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अनेक शंका आहेत. एकदिवसीय वर्ल्डकप झाल्यानंतर रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि निवड समितीची बैठक झाली तेव्हा विराट कोहलीची जागा निश्चित नव्हती. पण त्यानंतर अनके गोष्टी बदलल्या आहेत. विराट कोहलीने त्यादरम्यान विश्रांती घेतली असल्याने तो टी-20 वर्ल्डकपही खेळेल की नाही याबाबत स्पष्टता नव्हती. 

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरोधातील मालिका खेळली. विराट आणि रोहित शर्मा तब्बल 2 वर्षांनी टी-20 मध्ये परतले होते. यावेळी त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळणं पसंत केलं होतं. रोहित शर्मासह यशस्वी जैसवालने ओपनिंग केली होती. पण आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये हे समीकरण बदलू शकतं. 

'दैनिक जागरण'च्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीला टी-20 वर्ल्डकपमध्ये आपलं नेमकं काय स्थान आहे याबाबत स्पष्टता हवी आहे. यावेळी निवड समितीने त्याला ओपनिंगला येण्याचा पर्याय दिला आहे. 

विराट कोहली आयपीएलमध्ये गेल्या काही हंगामांपासून बंगळुरु संघाकडून ओपनिंग करत आहे. सध्या 7 सामन्यात 361 धावा करत तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. यावेळी त्याने एक शतकही ठोकलं आहे. 

विराट कोहलीची ओपनर म्हणून कामगिरी

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आघाडीला खेळण्याचा अनुभव आहे. त्याने 2008 मध्ये श्रीलंकेविरोधातील सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना ओपनर म्हणूनच सुरुवात केली होती. नंतर त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास सुरुवात केली होती. टी-20 मध्ये ओपनर म्हणून त्याच्या नावे चांगला रेकॉर्ड आहे. त्याने 9 सामन्यांमध्ये, 57 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत, जे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील सरासरी 51 पेक्षा जास्त आहे.

तसंच, कोहली ओपनिंग येतो तेव्हा त्याचा स्ट्राइक रेट 138 वरून 161 वर जातो. आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना त्याचे एकमेव टी-20 शतक ठोकलं होतं. 

जेव्हा कोहलीने रोहितसोबत सलामी दिली तेव्हा भारताने इंग्लंडविरुद्ध ​​224 धावा केल्या होत्या. रोहित आणि विराटने 9 षटकांत 94 धावांची भागीदारी केली होती. भारताकडून कोहलीने सर्वाधिक 52 चेंडूत 80 धावा केल्या तर रोहितने 34 चेंडूत 64 धावा केल्या.

जर कोहलीने रोहितसोबत सलामी दिली तर रिंकू सिंग, शिवम दुबे किंवा रियान पराग यांसारख्या पॉवर हिटर्ससाठी भारताच्या मधल्या फळीमध्ये जागा निर्माण होईल. तसंच सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. दरम्यान असं झाल्यास यशस्वी जैसवालला बाहेर बसावं लागू शकतं. निवड समिती त्याच्या तुलनेत शुभमन गिलला जास्त पसंती देत आहेत.