मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया रविवारपासून टी-20 वर्ल्डकपचं मिशन सुरू करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध उद्या होणार आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध सुपर-12 सामना खेळायचा आहे, त्यामुळे सर्वजण या सामन्याची वाट पाहत आहेत. सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
यावेळी रोहित शर्माने सांगितलं की, गेल्या 9 वर्षांपासून आम्ही एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, ही मोठी निराशाजनक बाब आहे.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, हे दडपण नाही, परंतु आम्ही चांगली कामगिरी कशी करू हे आमच्यासाठी नक्कीच एक मोठं आव्हान असणार आहे. तुम्हाला मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा आहे.
रोहित शर्माने आशिया कप 2023 संदर्भात एक विधान केलंय. रोहित म्हणाला, सध्या माझं लक्ष टी-20 वर्ल्ड कपवर आहे. कारण तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढे काय होईल याचा विचार आम्ही करत नाही. आणि त्याचा विचार करून काही उपयोगही नाही. बीसीसीआय त्यावर योग्य को निर्णय घेईल. मी फक्त पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याचा विचार करतोय.
आशिया कप 2023 पाकिस्तानमध्ये होणार असून बीसीसीआय सचिव जय शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय की, टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. दरम्यान बीसीसीआयच्या या भूमिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मात्र संतापलंय.
रोहित (Rohit sharma) पुढे म्हणतो, आम्हाला माहित आहे की आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे.त्यामुळे आम्ही एकावेळी एकच सामन्यावर लक्ष केंद्रीत करू. भारतासारख्या संघाकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात, पण आम्ही त्यांना निराश करणार नाही.