Best Tourist Places In Mumbai : मुंबई... या शहराशी प्रत्येकाचीच एखादी आठवण जोडली गेली आहे. शहरात लहानाचं मोठं होणारं प्रत्येकजण या शहरातील काही ठिकाणांना हमखास भेट देत असतं. अशी एक पिढी या शहरात असणारा म्हातारीचा बूट (Mhataricha Boot) पाहून मोठी झालीय आणि नव्या पिढीलाही हे ठिकाण ते कौतुकानं दाखवतायत.
शालेय सहलींपासून सुट्टीमध्ये भटकंतीसाठी जाण्याचं अनेकांचच आवडीचं ठिकाण म्हणजे दक्षिण मुंबईच्या मलबार हिल परिसरात असणारं कमला नेहरू पार्क आणि तिथं असणारा म्हातारीचा बूट. एखादा बूट किती मोठा असावा....? तर तो म्हातारीच्या बुटाइतका मोठाssss असावा असं अनेकजण म्हणतात. या ठिकाणाशी काही कथाही जोडल्या गेल्या आहेत. किंबहुना तुमच्यापैकी अनेकांना घरातल्या एखाद्या व्यक्तीनं या भल्य़ामोठ्या बुटामध्ये एक म्हातारी राहते, अशी गोष्टही ऐकवली असेल.
ही म्हाताली तुम्ही कधी पाहिलीये का? वयानं मोठे झालात तरी हा बुट नेमका कोणत्या म्हातारीचा आहे? हा प्रश्न तुमच्या मनात कायमस्वरुपी घर करून आहे का? चला तर मग, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच एका व्हिडीओच्या माध्यमातून पाहून घ्या.
omi_crayon नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका व्हिज्युअल आर्टिस्टनं कमाल गोष्ट सर्वांसमोर सादर केलीये. या कलाकारानं चक्क त्याच्या कलेचा सुरेख वापर करत म्हातारीच्या बुटामुळं कायमच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरणारी म्हातारी सर्वांसमोर आणलीय. इलस्ट्रेशन आर्टचा वापर करत या कलाकारानं एका म्हाताऱ्या आजीबाईंचं चित्र साकारत त्या जणू बुटाची लेस बांधत तिथं बसल्या आहेत असं भासवणारी कलाकृती सादर केली आहे.
काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये जसजसं आजीबाईंचं रुप साकारलं जातं तसतसं एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर दिसावं इतका उत्साह आणि या ठिकाणाप्रती असणारं कुतूहल पाहायला मिळतं. लहानांपासून मोठ्यांच्या मनाता ठाव घेणारा हा व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं भेटीला आलेली लाडाची आजीबाई तुम्हाला आवडली का?