'कार्तिकला टीम इंडियात स्थान मिळू शकतं तर...', सिलेक्टर्सवर भडकला सुरेश रैना

 36 वर्षीय दिनेश कार्तिकचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

Updated: May 25, 2022, 09:34 AM IST
'कार्तिकला टीम इंडियात स्थान मिळू शकतं तर...', सिलेक्टर्सवर भडकला सुरेश रैना title=

मुंबई : आयपीएल संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 5 सामन्यांची टी-20 सिरीज होणार आहे. यासाठी नुकताच BCCI ने 18 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. यावेळी अनेक दिग्गज खेळाडूंचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं असून त्यात 36 वर्षीय दिनेश कार्तिकचाही समावेश आहे. 

दरम्यान सिलेक्टर्सच्या या निर्णयावर माजी खेळाडू सुरेश रैनाने नाराजी व्यक्त केली आहे. स्टार फलंदाज सुरेश रैना  टीममध्ये सलामीवीर शिखर धवनच्या नावाचा समावेश नसल्याने नाराज झाला आहे.

आयपीएलमध्येशिखर धवनने पंजाब किंग्जकडून 14 सामन्यांमध्ये 460 रन्स केलेत. यावेळी त्याची सरासरी 38 च्या जवळ असून स्ट्राइकरेट 122 आहे. 

नुकतंच शिखर धवनने स्पष्ट केलं होतं की, तो पुढील 3 वर्ष क्रिकेट खेळण्यास तयार आहे. त्यामुळे तो टीम इंडियामध्ये कमबॅक करू शकेल, अशी आशा आहे. मात्र तसं झालं नाही. 

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुरेश रैना म्हणाला, 'शिखर धवन खूप निराश होईल. प्रत्येक कर्णधाराला त्याच्यासारखा खेळाडू आपल्या टीममध्ये हवा असतो. 

सुरेश पुढे म्हणाला, 'धवनने रन्सही चांगले केले आहेत. त्याने देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये चांगला खेळ केलाय. जर तुम्ही दिनेश कार्तिकचा टीममध्ये समावेश केला तर शिखर धवनलाही टीममध्ये स्थान मिळायला हवं होतं. धवनने गेल्या 3.4 वर्षांत सातत्याने रन्स केले आहेत. यामुळे कुठेतरी धवन खूप निराश होईल.'