Sunil Chhetri Retirement : भारतीय फुटबॉलला सोन्याचे दिवस दाखवणारा भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देईल. भावनिक व्हिडीओ शेअर करत सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली. छेत्रीने आतापर्यंत भारतासाठी 150 सामने खेळले आहेत आणि त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 94 गोल केले आहेत. भारतीय फुटबॉलसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. सुनील छेत्रीच्या कामगिरीचं कौतूक तर होतच आहे पण त्याच्या मेहनतीचं फळ देखील आज भारतीय फुटबॉलला मिळालंय. सुनीलची आज सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. मात्र, सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?
सुनील छेत्रीची लव्ह स्टोरी
2017 मध्ये सोनम आणि सुनील विवाहबंधनात अडकले. याआधी 13 वर्षं त्यांनी एकमेकांना डेट केलो होतं. सुनील आणि सोनम यांची लव्ह स्टोरी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. कारण सोनम ही सुनील छेत्री याचे प्रशिक्षक सुब्रतो भट्टाचार्य यांची मुलगी आहे. सुनील छेत्री एकेकाळी सुब्रतो भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली अंडर मोहन बागानमध्ये खेळत होता.
सुनील छेत्रीने एका मुलाखतीत सोनमसह झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलं होता. त्याने सांगितलं होतं की, तिचे वडील माझे प्रशिक्षक होते. त्यांच्या घरात कदाचित माझ्याबद्दल फार बोलणं होत असावं, ज्यामुळे सोनमच्या मनात माझ्याबद्दल कुतुहूल निर्माण होत अधिक जाणून घेण्याची ओढ तयार झाली असाली. त्यावेळी मी 18 वर्षांचा होता आणि सोनम 15 वर्षांची होती.
सुनील छेत्रीने सांगितलं होतं की, सोनमने वडिलांच्या मोबाइलमधून माझा नंबर चोरुन घेतला होता. त्यानंतर तिने मला मेसेज करत मी तुझी खूप मोठी चाहती असून, मला तुला भेटण्याची इच्छा आहे असं म्हटलं होतं. मला त्यावेळी ही मुलगी कोण आहे याची माहिती नव्हती. तिने इतक्या साधेपणाने विचारलं होतं की, मी तिला भेटण्यासाठी नकार देऊ शकलो नाही.
सुनील छेत्री खेळामुळे सतत प्रवासात असायचा. यामुळे त्याची आणि सोनमची जास्त भेट होत नव्हती. एका वर्षात त्यांची फक्त दोन ते तीन वेळाच भेट होत होती. यामुळे ते लपून सिनेमा हॉलमध्ये भेटत असतं. तिथेही दोघं कोणीतरी पाहील या भीतीने एकत्र जात नसत.
दरम्यान, अनेक वर्षांनी सुनील छेत्रीने हिंमत करुन सोनमच्या वडिलांकडे लग्नासाठी विचारणा केली होती. पण ते आपले प्रशिक्षक असल्याने तो खूप घाबरला होता. पण सुनील छेत्रीला ज्याची भीती वाटत होती तसं काही झालं नाही. काही वेळ विचार केल्यानंतर त्यांनी लग्नासाठी होकार दिला होता.