गॉल : येथे सुरु असलेल्या कसोटीमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केलाय. तर श्रीलंकेची टॉप ऑर्डर कोसळल्याने कसोटीवर पकड मजबुत केलेय. भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केलाय. तर हार्दिक पंड्याची पदार्पणातच अर्ध शतक झळकावलेय.
दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे. भारताने दिलेल्या ६०० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची१५४/५ अशी दयनीय अवस्था झाली आहे. श्रीलंकेच्या संघावर फॉलोऑनचं संकट आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अजूनही २४७ धावांची गरज आहे.
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत लंकेची दाणादाण उडवून दिली आहे. सध्या श्रीलंकेकडून माजी कर्णधार अँजलो मॅथ्यूज खेळत असून त्याने अर्धशतक झळकावले आहे. तो ५४ धावांवर नाबाद आहे. त्याच्यासोबत दिलरुवान परेरा सहा धावांवर खेळत आहे.
भारताकडून मोहम्मद शमीनं दोन, तर उमेश यादव आणि रवीचंद्रन अश्विननं प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडून भारताला गॉल कसोटीवर घट्ट पकड मिळवून दिली. भारतीय संघाच्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची तीन बाद ६८अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि उपुल थरंगा या जोडीने चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचत श्रीलंकेची धावसंख्या शंभरीपार नेली.