आरोप करणाऱ्या पाकिस्तानला श्रीलंकेचं प्रत्युत्तर

 पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायला श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी नकार दिला आहे.

Updated: Sep 11, 2019, 10:34 AM IST
आरोप करणाऱ्या पाकिस्तानला श्रीलंकेचं प्रत्युत्तर title=

कोलंबो : पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायला श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी नकार दिला आहे. यामुळे भडकलेल्या पाकिस्तानच्या मंत्र्यांनी भारतावर आरोप करत थेट आयपीएलला जबाबदार धरलं. यानंतर आता श्रीलंकेने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. आयपीएल नाही तर सुरक्षेच्या कारणामुळे खेळाडू पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित नाहीत, असं श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हरीन फर्नांडो यांनी स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. 'पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली नाही तर आयपीएलमधून बाहेर काढण्यात येईल, अशी धमकी भारताने श्रीलंकेच्या खेळाडूला दिल्याचं एका कॉमेंटेटरने मला सांगितलं. खेळामध्ये राष्ट्रवाद आणण्याची निंदा केली पाहिजे. भारताचे क्रीडा अधिकारी जे करत आहेत, ते निंदनीय आहे,' असं ट्विट फवाद यांनी केलं होतं.

fawad

पाकिस्तान आणि श्रीलंकेमधली ही सीरिज २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमानुसार दोन्ही टीम ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत. कइन्फोने दिलेल्या माहितीनुसार दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला आहे.

२००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात बचावले होते. तेव्हापासून कोणत्याच टीमने पाकिस्तानमध्ये जाऊन पूर्ण दौरा केला नाही. श्रीलंकेने २०१७ साली पाकिस्तानमध्ये टी-२० मॅच खेळली होती, पण त्यावेळीही प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली होती.