वर्ल्ड कपमध्ये गोल्ड, ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास... भारताच्या स्टार जिम्नास्टने जाहीर केली निवृत्ती

Dipa Karmakar Announces Retirement : भारताची स्टार जिम्नास्ट दीपा करमाकरने व्यावसायिक जिमनास्टिकमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 25 वर्षांच्या मोठा कारकिर्दीत दीपाने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

राजीव कासले | Updated: Oct 7, 2024, 07:11 PM IST
वर्ल्ड कपमध्ये गोल्ड, ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास... भारताच्या स्टार जिम्नास्टने जाहीर केली निवृत्ती title=

Dipa Karmakar Announces Retirement : भारताची स्टार जिम्नास्ट दीपा करमाकरने (Dipa Karmakar) व्यावसायिक जिमनास्टिकमधून (Gymnastic) निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. 25 वर्षांच्या मोठा कारकिर्दीत दीपाने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत निवृत्ती जाहीर केलीय. 'मॅटपासून रजा घेत आहे! माझ्या प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार. आता पुढच्या अध्यायाकडे' असं दीपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दीपाने शेअर केली पोस्ट
दीपा करमाकरने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहित निवृत्ती घेत असल्याचं म्हटंल आहे. आपल्या पोस्टमध्ये तीने लिहिलंय 'खूप विचार केल्यानंतर जिमनास्टिकमधून निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण हीच योग्य वेळ आहे. जिमनॅस्टिक हा माझ्या आयु्ष्याचा सर्वात मोठा हिस्सा आहे आणि यासाठी मी आयुष्यभर आभारी राहिन'

भारतासाठी जिंकलं गोल्ड
दीपाच्या जिमनॅस्टिक कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. पण समस्यांवर मात करत दीपाने 2018 मध्ये तुर्की इथं झालेल्या वर्ल्ड कप जिमनॅस्टिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकत भारताला ऐतिहासिक यश मिळवून दिलं. वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय जिमनॅस्टिकपटू ठरली होती. 2021 मध्ये तीने ताश्कंद इथं झालेल्या आशियाई जिमनॅस्टिक स्पर्धेतही भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलं. 

ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास
दीपा करमाकरच्या जिमनॅस्टिक कारकिर्दीतील सर्वात आठणतीला क्षण म्हणजे ऑलिम्पिकमधली कामगिरी. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाने शानदार कामगिरी करत वॉल्ट प्रकाराच्या फायनलमध्ये धडक मारली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू होती. या प्रकारात दीपाचं मेडल थोडक्यात हुकलं. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण भारतीयांबरोबर जगभरातील क्रीडा चाहत्यांनी दीपाच्या लढावू वृत्तीचं कौतुक केलं. याशिवाय दीपाने अनेक स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी केली आहे. 

अनेक पुरस्कारांची मानकारी
आपल्या कारकिर्दीद दीपा करमाकर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरली. भारताचा चौथा सर्वात मोठा नागरि पुरस्करा पद्म श्रीने तिला सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल तिचा अर्जुन पुरस्कारानेही गौरव करण्यात आला. देशातल्या सर्वोच्च ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारानेही दीपाचा सन्मान करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या अंडर-30 अचिवर्समध्येही दीपाचा समावेश करण्यात आला होता.

ऑलिम्पिकमधल्या दमदार कामगिरीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दीपाला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. पण मेंटेनन्स आणि खराब रस्त्यांचं कारण देत दीपाने ही कार परत केली होती.