कोलकाता बलात्कार प्रकरणी सौरव गांगुलीने उचललं मोठं पाऊल, पत्नीसह उतरणार रस्त्यावर

कोलकाता बलात्कार खून प्रकरणी सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र आता गांगुलीने याबाबत स्पष्टीकरण दिलं असून त्याने या घटनेविरुद्ध मोठं पाऊल उचललं आहे. 

Updated: Aug 20, 2024, 10:29 PM IST
कोलकाता बलात्कार प्रकरणी सौरव गांगुलीने उचललं मोठं पाऊल, पत्नीसह उतरणार रस्त्यावर title=
(Photo Credit : Social Media)

कोलकाता बलात्कार खून प्रकरणी पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्थरातून मागणी होत आहे. कोलकातामधील नागरिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी निदर्शन केली जात आहेत. कोलकाता बलात्कार खून प्रकरणी सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र आता गांगुलीने याबाबत स्पष्टीकरण दिलं असून त्याने या घटनेविरुद्ध मोठं पाऊल उचललं आहे. 

या वक्तव्यामुळे झाला वाद : 

काही दिवसांपूर्वी गांगुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याला कोलकाता बलात्कार खूप प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गांगुली व्हिडिओमध्ये म्हणाला, "मला वाटत नाही की या एका घटनेवरून सर्व काही किंवा प्रत्येकजण सुरक्षित नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. अशा घटना जगभर घडत असतात. त्यामुळे मुली सुरक्षित नाहीत, असा विचार करणे चुकीचा आहे. केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतात महिला सुरक्षित आहेत. आपण जिथे राहतो ते सर्वोत्तम ठिकाण आहे. एका घटनेवरून कुणालाही दोष देऊ नये".

हेही वाचा  : बांगलादेश नाही तर आता 'या' देशात होणार महिला टी 20 वर्ल्ड कप, ICC ने दिली मोठी अपडेट

 

गांगुलीने वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण : 

गांगुलीने व्हिडिओमध्ये केलेल्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर त्याने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हंटले की, "मला माहित नाही की मी गेल्या रविवारी काय बोललो होतो, ते कसं मांडलं गेलं आणि त्याचा अर्थ काय घेण्यात आला. पण माझ्या विधानाचा हेतू चुकीचा नव्हता. ही एक अत्यंत लज्जास्पद आणि भयंकर घटना आहे, हे मी आधीही सांगितले आहे. आता सीबीआय आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मला आशा आहे की सीबीआयने दोषींना शोधल्यानंतर त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा अशी असावी की आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याचे धाडस कोणी करू नये. अशा प्रकारची कठोर शिक्षा दिली पाहिजे".

सौरव गांगुली आणि पत्नी उतरणार रस्त्यावर : 

कोलकाताच्या सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या केल्या प्रकरणी संपूर्ण देशात रोष व्यक्त केला जात आहे. आरोपीला शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. क्रिकेटर सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली ही कोलकातामध्ये दीक्षा मंजरी नावाने डान्स अकॅडमी चालवते. डोना गांगुली त्यांच्या डान्स अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसोबत कोलकाता प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा यासाठी लॉन्ग मार्च काढणार आहे. बुधवारी सायंकाळी ७ : ३० वाजता शांततेत हा मार्च काढला जाणार असून यात डोना आणि सौरव गांगुली हे सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत. डोना गांगुली यांनी स्वतः ETV भारत ला याबाबत माहिती दिली. सौरव गांगुलीने कोलकाता प्रकरणाचा निषेध व्यक्त करत त्याच सोशल मीडिया प्रोफाईल ब्लॅक केलं आहे.