बीसीसीआय अध्यक्ष झाल्यावर गांगुली सगळ्यात पहिले करणार हे काम

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचं बीसीसीआयचा अध्यक्ष होणं जवळपास निश्चित झालं आहे.

Updated: Oct 14, 2019, 12:37 PM IST
बीसीसीआय अध्यक्ष झाल्यावर गांगुली सगळ्यात पहिले करणार हे काम title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचं बीसीसीआयचा अध्यक्ष होणं जवळपास निश्चित झालं आहे. निवडीची ही प्रक्रिया पूर्ण व्हायला कमीत कमी एक आठवड्याचा वेळ लागणार आहे. पण अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्थानिक क्रिकेटपटूंच्या आर्थिक हिताला आणि त्यासाठी रणजी ट्रॉफीवर लक्ष केंद्रीत करण्याचं काम करणार आहोत, असं गांगुलीने सांगितलं आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट संस्थेला चालवणं हे एक आव्हान असेल, पण मी आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने दिली.

बीसीसीआयची प्रतिमा ही सध्या चांगली नाही, त्यामुळे मला मिळालेली ही एक मोठी जबाबदारी आहे. काहीतरी करून दाखवण्याची ही मोठी संधी आहे. भारत एक मोठी ताकद आहे आणि हे माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल, असं गांगुलीला वाटत आहे.

२३ ऑक्टोबरला बीसीसीआयच्या पदांसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची तारीख १४ ऑक्टोबर आहे. शनिवार आणि रविवारी दिल्ली आणि मुंबईत राज्य क्रिकेट असोसिएशनच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये गांगुलीचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं. याचसोबत ब्रजेश पटेल यांचं आयपीएल अध्यक्ष बनणंही निश्चित झालं आहे.

सौरव गांगुलीला २०२० पर्यंतच अध्यक्षपदी कायम राहता येणार आहे. सौरव गांगुलीला काही काळासाठी लांब राहावं लागणार आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार प्रशासकीय पदावर एखादी व्यक्ती लागोपाठ ६ वर्षांपेक्षा जास्त राहू शकत नाही. गांगुली हा सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर आहे. हा नियम आहे त्यामुळे तो पाळावाच लागेल, असं गांगुली म्हणाला.