'तुला पुरुषात कोणते गुण हवेत?', KBC मध्ये प्रश्न ऐकताच स्मृती मंधानाच्या भुवया उंचावल्या; 'असे प्रश्न...'

भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज स्मृती मंधाना नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला चाहत्याने तुला नेमका कसा मुलगा आवडेल? असा प्रश्न विचारला.   

शिवराज यादव | Updated: Dec 27, 2023, 01:15 PM IST
'तुला पुरुषात कोणते गुण हवेत?', KBC मध्ये प्रश्न ऐकताच स्मृती मंधानाच्या भुवया उंचावल्या; 'असे प्रश्न...' title=

स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. स्टार खेळाडूंमध्ये तिची गणना केली जाते. स्मृतीने आतापर्यंत 6 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत. तिन्ही प्रकारात तिने आतापर्यंत 6000 धावा केल्या आहेत. नुकतीच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत तिने 74 आणि नाबाद 38 धावा ठोकल्या. भारताने यावेळी कसोटीतील पहिल्या विजयाची नोंद केली. दरम्यान नुकतंच स्मृतीने 'कौन बनेगा करोडपती'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडी इशान किशनही होता. यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासह उपस्थित प्रेक्षकांनी स्मृतीला अनेक प्रश्न विचारले. 

एका चाहत्याने यावेळी स्मृतीला विचारलं की, "तुमचे इंस्ट्राग्रामला इतके पुरुष फॉलोअर्स आहेत. तुम्हाला एका मुलामधे नेमके कोणते गुण हवे आहेत?". हा प्रश्न ऐकताच इशान किशनसह सर्वजण हसू लागतात. एकदम प्रश्न वळवला अशी कमेंटही इशान करतो. दरम्यान अमिताभ बच्चन चाहत्याला 'तुझं लग्न झालं आहे का?' अशी विचारणा करतात. त्यावर चाहता म्हणतो 'नाही सर. त्यामुळेच तर मी विचारत आहे'.

दरम्यान स्मृती प्रश्नाचं उत्तर देताना सांगते की, "मी अशा प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. चांगला मुलगा असावा हेच जास्त महत्त्वाचं आहे. तो काळजी घेणारा आणि माझा खेळ समजून घेणारा असावा. हे दोन महत्त्वाचे गुण त्याच्याकडे असले पाहिजेत. कारण एक मुलगी म्हणून मी त्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही. त्याने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि त्याची काळजीही घेतली पाहिजे. याच प्राथमिकता आहेत. हेच गुण मी मुलात पाहत आहे".

दरम्यान बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेसाठी महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर एकदिवसीय आणि टी-20 संघाचं नेतृत्व करेल, तर स्मृती  उपकर्णधार असेल. संघाला इंग्लंडविरुद्ध T20I मालिकेत 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामने जिंकत त्यांनी इतिहास रचला. 

ऑस्ट्रेलियात संघ प्रथम तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. सर्व सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. तर तीन टी-20 सामने नवी मुंबईत होणार आहेत.