भारत-श्रीलंका आज तिसरी कसोटी, पावसाचे सावट

भारत-श्रीलंकेदरम्यान आज तिसरा कसोटी सामना होत आहे. कसोटी जिंकून इतिहास घडवण्याचा विराट टीमचा निर्धार असेल. हा सामना पल्लिकेलेच्या मैदानावर होत आहे. दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 12, 2017, 09:03 AM IST
भारत-श्रीलंका आज तिसरी कसोटी, पावसाचे सावट title=

कोलंबो : भारत-श्रीलंकेदरम्यान आज तिसरा कसोटी सामना होत आहे. कसोटी जिंकून इतिहास घडवण्याचा विराट टीमचा निर्धार असेल. हा सामना पल्लिकेलेच्या मैदानावर होत आहे. दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एक नवा इतिहास घडवण्यासाठी प्रयत्नशील असेल. परदेशातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ऐतिहासिक यश मिळविण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल पल्लिकेलेच्या खेळपट्टीवर आजपासून सुरू होणारा श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

भारताने मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने मोठय़ा फरकाने जिंकलेत. गॉल येथील पहिल्या सामन्यात भारताने ३०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला, तर कोलंबोतील दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि ५३ धावांनी शानदार विजय मिळवला.

 गेले काही महिने श्रीलंकेचा संघ वाईट अवस्थेतून जात आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत हा संघ झगडतोय. कँडीमध्ये खेळपट्टीचे स्वरूप बदलून किमान अखेरचा सामना जिंकून शेवट गोड कराण्यासाठी श्रीलंकेचा प्रयत्न असेल. मात्र हे सारे हवामानावर अवलंबून आहे. 

पावसामुळे भारताला शुक्रवारी सराव सत्र रद्द करावे लागले. फिरकीची हत्यारे बोथट ठरल्यानंतर आता वेगवान गोलंदाजांसह आक्रमण करण्याचे श्रीलंकेने ठरवले आहे. त्यामुळे दुष्मंता चामीरा आणि लाहीरू गॅमेज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. नूवान प्रदीप आणि रंगना हेराथ हे दुखापतग्रस्त खेळाडू संघाबाहेर असतील.