मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला आहे. टी-२० सीरिज ५-०च्या अंतराने जिंकणारी भारतीय टीम ही जगातली पहिलीच ठरली आहे. तसंच न्यूझीलंडमध्ये भारताने पहिल्यांदाच टी-२० सीरिज जिंकण्याचा विक्रमही केला आहे. पण याच मॅचमध्ये भारताचा ऑलराऊंडर शिवम दुबेच्या नावावर नकोसं रेकॉर्ड झालं आहे.
९व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा स्कोअर ६३ रनवर ३ विकेट असा होता. इनिंगची १०वी ओव्हर शिवम दुबेने टाकली, पण या ओव्हरमध्ये दुबेने तब्बल ३४ रन दिले. सायफर्ट आणि टेलरने दुबेला दोन-दोन सिक्स आणि एक-एक फोर मारली. या ओव्हरनंतर न्यूझीलंडची टीम ही मॅच जिंकेल असं वाटत होतं. टीम सायफर्ट आणि रॉस टेलरने अर्धशतकंही झळकवली, पण दोघंही चुकीच्या क्षणी आऊट झाल्यामुळे हा सामना भारताने जिंकला.
टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय बॉलरने एका ओव्हरमध्ये दिलेले हे सर्वाधिक रन आहेत. याआधी स्टुअर्ट बिन्नीने २०१६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध ३२ रन दिले होते. तर २०१२ साली सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका ओव्हरमध्ये २६ रन दिले.
टी-२० क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन देण्याचा विक्रम इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे. २००७ वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने एका ओव्हरमध्ये ३६ रन दिले होते. युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला ६ बॉलमध्ये ६ सिक्स लगावले होते. स्टुअर्ट ब्रॉडनंतर एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन देण्याचा विक्रम शिवम दुबेने स्वत:च्या नावावर केला आहे.