धवनच्या शतकामुळे भारताचा धावांचा डोंगर

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. 

Updated: Jun 8, 2017, 07:48 PM IST
धवनच्या शतकामुळे भारताचा धावांचा डोंगर title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. ५० ओव्हरमध्ये भारतानं ३२१/६ पर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवननं १२८ बॉल्समध्ये १२५, रोहित शर्मानं ७९ बॉल्समध्ये ७८ आणि महेंद्रसिंग धोनीनं ५२ बॉल्समध्ये ६३ रन्स केल्या तर तळाला आलेल्या केदार जाधवनं १३ बॉल्समध्ये २५ रन्स करत भारताला ३२० रन्सचा टप्पा पार करून दिला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील धवनचं तिसरं शतक

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेहमी शानदार फलंदाजी करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने पुन्हा एक शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे तिसरे शतक आहे.

वन डे कारकिर्दीतील हे त्याचे १० वे शतक आहे.  त्यातील तीन त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लगावले आहेत. शिखरने ११२ चेंडूत १३ चौकारांसह आपले शतक साजरे केले. शिखरने सुरूवातील सावध पवित्रा घेतला होता. पण रोहित शर्मा बाद झाल्यावर त्याने आपला धडका कायम ठेवत शतक साजरे केले.

यापूर्वी त्याने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये  दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरूद्ध शतकी खेळी केली होती.  दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने ९४ चेंडू ११४ धावा केल्या होत्या.  तर वेस्ट इंडिजविरूद्ध  १०२ चेंडूत नाबाद १०७ केले होते.

विराट शून्यवर बाद

या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही.  यापूर्वी आपल्या १८० सामन्यात तो १० वेळा शून्यावर बाद झाला होता.

एकूण १७२ इनिंगमध्ये विराट पहिल्यांदाच श्रीलंकेविरूद्ध शुन्यावर बाद झाला आहे. विराटला शून्यावर बाद करण्याचा मान श्रीलंकेचा गोलंदाज प्रदीप याला मिळाला आहे. आतापर्यंत विराट कोहलीने वनडे मध्ये २७ शतक आणि ४० अर्धशतक लगावले आहेत.

गेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये कोलकता नाईट राइडर्स विरूद्ध खेळताना तो शून्यावर बाद झाला आहे.

टेस्टमध्ये विराटच्या नावावर वेगळा विक्रम

तब्बल १०४ इनिंगनंतर शुन्यावर बाद झालेला विराट हा पाहिला खेळाडू आहे.